मुंबई Aaditya Thackeray :युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘महानिष्ठा, महान्याय, महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्यातल्या जनतेशी शनिवारी संपर्क साधला. "गद्दारांनी कितीही रडारड केली तरी त्यांच्यावर असलेला ‘गद्दार’ आणि ‘बापचोर’ हा शिक्का कधीच पुसला जाणार नाही," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर (CM Eknath Shinde) टीका केलीय. तसंच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही भाजपामध्ये प्रवेश करायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
आदित्य ठाकरेंचा दौरा : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या "महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र"च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात झंजावात सुरू आहे. शनिवारी राजधानी मुंबईत लालबाग विभाग क्रमांक ११ येथे आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. या सभेला शिवसैनिक आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण लालबाग शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.
राहुल गांधींनीही भाजपामध्ये जायला पाहिजे : सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला तर भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी वाईट वाटतंय, कारण आता ज्या काही नेत्यांना पद दिली आहेत, त्यातले अनेक बाहेरचे आहेत. मी तर राहुल गांधी यांना सल्ला देईन की, तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर, तुम्ही भाजपामध्ये जा. कारण तिथे सर्व काँग्रेसवालेच आहेत. 'दाग अच्छे है, वाशिंग पावडर भाजपा' असा नवीन नारा आता भाजपानं सुरू केलाय. जेवढे गद्दार भ्रष्टाचारी आहेत, ते सर्व भाजापामध्ये आहेत."
सरकारला धरलं धारेवर : सभेला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. "सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडलंय. पण आपण मुंबईकर आहोत. आपण भविष्यावर काम करणारी लोकं आहोत, पण सध्याच्या सरकारकडून सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जात आहेत. यांची फक्त टॅगलाईन बदलत असतात परिस्थिती तिच राहते. 'अब की बार ४०० पार आणि वैगरे वैगरे'. फक्त निवडणुका आल्या की, घोषणा बदलतात कामं तर होत नाहीत," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं.
'गदार' हा टॅग पुसला जाणार नाही : शिवसेना, शिवसैनिक आणि जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणा दरम्यान ठणकावून सांगितलं की, "गद्दारांनी आतासुद्धा काहीतरी रडारड केली. पण तुमच्यावर असलेला 'गद्दार' आणि 'बापचोर' ही टॅगलाईन कधीच पुसली जाणार नाही. प्रकल्प गुजरातला पळवतायत, मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला. जर ती मॅच मुंबईत झाली असती तर आज निर्णय वेगळा असता. पण महाराष्ट्राच्या विकासाशी देणंघेणं नाही. सगळं गुजरातला पाठवलं जातंय, याला आमदार बनवू, याला खासदार बनवू पण तरुणांचं काय? त्यांच्या रोजगाराचं काय?" असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सरकारला केलाय.
ईडी, सीबीआय येतील, पण घाबरायचं नाही : देशभरात आणि राज्यभरात सरकारकडून शिवसैनिकांवर केंद्रीय आस्थापनांच्या दबावतंत्रावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, "आज या गद्दारांच्या विरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तर जेलमध्ये जाऊन आले, आता तर ते कोणाला घाबरत नाहीयेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. तुमच्या घरीसुद्धा ED, CBI घेऊन येतील पण आपण घाबरायचं नाही. आपण मुंबईकर एक होऊन लढायचं."
महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या कारभारावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मंत्रिमंडळात एक असा मंत्री आहे, ज्यानं एका महिला खासदाराला शिवीगाळ केली होती, त्याला प्रमोशन देण्यात आलं. आमच्या मंत्रिमंडळात एका गद्दरावर गंभीर आरोप झाले होते, त्याला आम्ही लगेच हकलवून लावलं होतं, पण जेव्हा या गद्दरांचे सरकार आलं तेव्हा त्याला लगेच मंत्रिपद दिलं. बिल्कीस बानो यांच्या रेपिस्टचा सत्कार करण्यात आला हे आपलं हिंदुत्व नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अशी शिकवण दिली नाहीय. अत्याचार झालेल्या महिलेची जात, धर्म आपण कधी बघत नाही. महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे."
हेही वाचा -
- आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार? काय आहेत कारणं? जाणून घ्या
- बाळासाहेबांचा वारसा सांगायला मनगटात जोर असावा लागतो- मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- नकुल नाथ यांनी सोशल मीडियातून हटविलं काँग्रेसचं नाव, कमलनाथ यांनी ही' दिली प्रतिक्रिया