अमरावती Lok Sabha Election 2024:कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या परतवाडा येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले की, या देशातील विद्यमान सरकारनं आणि भाजपानं संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. संविधान बदलण्याचा डाव केलाय. आजपर्यंत कोणीही अशा पद्धतीनं संविधान बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळं ही निवडणूक संविधान वाचवण्याची आहे, असं राहुल गांधी म्हणाले. देशातील गरीब आणि दलितांचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, या वर्गाचा आवाज कोण दाबतोय तो आम्ही पाहणार आहोत, असा इशाराच त्यांनी यावेळी दिलाय.
22 लोकांसाठी सरकार राबते आहे: देशातील कोट्यवधी लोकांच्या कल्याणासाठी नाही तर केवळ 22 उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी मोदी सरकार गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. देशातील 70 कोटी लोकांकडं जितकी संपत्ती आहे, तितकी संपत्ती या 22 लोकांकडं आहे. नरेंद्र मोदींनी असा देश तयार केला आहे, नरेंद्र मोदींनी शेतकरी आणि विद्यार्थी यांचं किती कर्ज माफ केलं, असा सवाल उपस्थित करीत या केवळ 22 लोकांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले गेले, असा दावा त्यांनी केलाय.
गरीब कुटुंबाची यादी करणार : आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज जेवढं माफ केलं ते जर 25 वेळा माफ केलं तर एकूण मिळून या उद्योगपतींचं कर्ज माफ केल्याची रक्कम होते. यापुढं आता असं होणार नाही, देशातील गरीब परिवाराची आम्ही यादी तयार करणार आहोत, या गरीब परिवारातील एका महिलेला निवडणार आहोत आणि त्या महिलेच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळं प्रत्येक महिन्यात महिलेच्या खात्यात साडेआठ हजार रुपये आणि वर्षाला एक लाख रुपये कोट्यवधी महिलांच्या खात्यात येणार आहेत. तुम्ही देशात केवळ 25 अरबपती तयार करा, आम्ही करोडो लखपती करणार,असं आव्हान राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारला दिलं. घरात 24 तास सन्मानाने काम करणाऱ्या महिलेला तिचा अधिकार मिळवून देणार आहे, असंही ते म्हणाले.
महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण : यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिलांना सरकारी नोकरीत 50% आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा केली. आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करणार असून मोदींनी देशातील तरुणांना फसवलं आहे, नोटबंदी आणि जीएसटी लागू करून बेरोजगारी वाढवली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशातील सर्व पदवीधारकांना प्रशिक्षणार्थी म्हणजेच अप्रेंटीशीपची नोकरी एक वर्षासाठी दिली जाईल, देशातील श्रीमंत लोकांना आपल्या मुलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतात, त्याच सुविधा गरिबांच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सरकारी आणि खासगी क्षेत्रात एक वर्षासाठी ही अप्रेंटीशीप देण्यात येणार असून ज्यांना पदवीनंतर अप्रेंटीशीप मिळणार नाही, त्यांच्या खात्यात एक लाख रुपये देण्यात येतील, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं.