पुणे Prakash Ambedkar On Manoj Jarange :पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिलाय. ते म्हणाले की, "आम्ही आण्णा पाटील यांचं आंदोलन बघितलं आहे. आण्णा पाटील यांचं आंदोलन जिरवण्यात आलं आहे. आता मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी राज्यात उभं राहिलेलं आंदोलन जिरवायचं नसेल, तर जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. जर तुम्ही निवडणुकीत उभे राहिले नाही, तर येथील निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. येथल्या गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाहीत. कारण ते उभे राहू दिले नाहीत. त्यामुळं उपेक्षितांच्या चळवळीत एकजूट होणं गरजेचं आहे."
वंचित-मुस्लिम भेद मिटवा : "जरांगे पाटील यांना नवीन मित्र शोधावं लागणार आहे. नवीन मित्र हा येथल्या मुसलमानांशिवाय दुसरा कोणीही नाही. आज मुस्लिम समाज देखील स्वतःची सुरक्षा वेगवेगळ्या राजकीय पक्षात शोधत आहे. मी आज मुस्लिम समाजाला सांगतो की, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही. आज मुस्लिमांना अलिप्तपणातून मुक्त व्हावं लागणार आहे. तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि येथल्या वंचितांच्या बरोबर फिरेल, तेव्हा समूह त्यांना सुरक्षितता दिल्या शिवाय राहणार नाही. आपल्याला 48 पैकी 48 जागा जिंकायच्या असतील तर वंचित मुस्लिम हा भेद मिटवावा लागणार आहे. मगच आपण 48 पैकी 48 जागा जिंकू," असं यावेळी आंबेडकर यांनी म्हटलंय.