मुंबई Prakash Ambedkar News :वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करुन नवीन विषयाला फाटे फोडलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट जमलंय का? तसंच भाजपामधील दुसऱ्या गटासोबत शरद पवार संधान बांधत असल्याची शंका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीय. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? :यासंदर्भात आज (7 मे) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "भाजपात सध्या दोन गट पडलेत. एकीकडं अमित शहा यांचा एक गट कार्यरत आहे, तर दुसरीकडं राजनाथ सिंह यांचा एक गट. बीसीसीआयच्या सत्ता कारणावरून अमित शहा आणि शरद पवार हे आमने-सामने आहेत. त्यामुळं शरद पवार हे राजनाथ सिंह यांच्या गटाच्या संपर्कात आहेत का? अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपाच्या जवळचा पक्ष असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. महाविकास आघाडीत सामील होताना मी स्पष्टपणे म्हटलं होतं की, भाजपसोबत जाणार नाही असा सर्व पक्षांनी मिळून ठराव करायला पाहिजे. मात्र, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी तसं करण्यास नकार दिला, त्यामुळं त्यांच्या मनात काय आहे? हे स्पष्ट होतं", असंही आंबेडकर म्हणाले.