महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

कोण होणार मुख्यमंत्री? शिंदे, फडणवीस की आणखी कोणी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - MAHARASHTRA NEW CM

महायुतीत मुख्यमंत्री पदासाठीची रस्सीखेच सुरू असली, तरी सर्वपक्ष सामंजस्यानं निर्णय घेतील, असा दावा केला जातोय. काही नेत्यांच्या मते भाजपाकडून तिसऱ्या पर्यायाचाही विचार केला जाऊ शकतो.

Political Leaders reaction on Who Is Maharashtra CM, Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
कोण होणार मुख्यमंत्री (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2024, 11:11 AM IST

मुंबई :विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) निकाल महायुतीच्या बाजूनं लागून सहा दिवस उलटूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं सर्वांचंच लक्ष राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींकडं लागलंय. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा 100 च्या वर जागा मिळवण्यात यश आलंय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जातंय. मात्र, यापूर्वीचा मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाबाबत भाजपाचा अनुभव बघता ऐन वेळेवर भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी इतर कुणाला मुख्यमंत्री पदी बसवू शकतं, अशीही शक्यता निर्माण झालीय. यावरच आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुख्यमंत्री भाजपाचाच होणार :यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, "नवा मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही काळात खूप मेहनत केली आहे. आम्हाला वाटलं होतं की मागच्या वेळीही तेच मुख्यमंत्री होतील. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी काम केलं आणि पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. त्यामुळं त्यांचा हा नैसर्गिक हक्क असून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत."

छगन भुजबळ, प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

दादा मुख्यमंत्री झाले तर खूपच आनंद : अजित पवार हे देखील मुख्यमंत्री पदाबाबत इच्छुक आहेत. याविषयी विचारण्यात आलं असता भुजबळ म्हणाले की, "दादा जर मुख्यमंत्री झाले तर खूपच आनंद आहे. पण यावेळेस भाजपाकडं 132 आमदार आहेत. ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होणार. त्यामुळं जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तरी आनंदच आहे."

एकनाथ शिंदेंचे बॅनर :काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भातील सर्व निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींच्या हाती सोपवलाय. त्यामुळं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे यांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. असं असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासाठी मराठा समाजाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. "आमचा लाडका छावा पुन्हा मुख्यमंत्री पदी हवा", "शिंदे सरकार मराठा सरदार", "हवे आरक्षण हक्काचे, तर हवा सरदार हक्काचा", अशा आशयाचे बॅनर सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरात लावण्यात आले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले? :विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज्यात महायुतीचं सरकार आलं तर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार, या आशयाच्या चर्चांना उधाण आलं होतं. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतो. साईबाबांचं दर्शन घेण्यामागे काही उद्देश नव्हता. मी आहे तिथंच सुखी आहे", असं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

चिखलीकरांना मंत्री पद मिळणार? :मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार? त्याप्रमाणेच मंत्री पद कोणा-कोणाला मिळणार? यासंदर्भातही तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच नांदेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी "आमदार नको आता नामदार पाहिजे", असे बॅनर लावले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मी सिनिअर असलो तरी माझ्यापेक्षा अनेकजण सिनिअर आहेत. मंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि सर्वांना तो मान्य करावा लागेल."

हेही वाचा -

  1. महायुतीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या फोटोची चर्चा, बहुमतानं बिघडलं राजकीय गणित?
  2. अमित शाह यांची महायुती नेत्यांसोबत अडीच तास रंगली खलबतं, पण तरीही ठरेना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ?
  3. मुख्यमंत्री ठरला? देवेंद्र फडणवीसांनी मानले अमित शाह यांचे आभार, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details