नाशिक : राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Guardian Minister Post) जाहीर होतात अवघ्या काही तासात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पालकमंत्री पद दिल्यानं महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं, तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. त्यामुळं राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री पदाची यादी जाहीर : महायुतीमध्ये खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री पदाचा निर्णय बराच काळ रखडला होता. अखेर दीड महिन्यानंतर 18 जानेवारीला रात्री उशिरा पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात पालकमंत्री पदाचे वाटप करताना अनेकांना डावलण्यात आल्यानं नाराजी पसरली आहे. रायगडमध्ये तर मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं तेथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं सामूहिक राजीनामे देत निषेध व्यक्त केला. तर नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांना डावलण्यात आल्यानं त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्या आशा पल्लवीत : गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला राष्ट्रवादीने (अजित पवार) विरोध केला होता. जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक सात आमदार आहेत तर भाजपाचे पाच आमदार आहेत. तरीही माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचं पालकमंत्री पद देण्यात आल्यानं नाराजी होती. जिल्ह्यात भाजपाचा मंत्री नसतानाही जळगावचे महाजन यांना पालकमंत्री दिल्यानं नाराजीत वाढ झाली होती. अशात दोन्ही जिल्ह्यात मोठ्या नाराजी नाट्यानंतर अवघ्या काही तासात 19 जानेवारीला रात्री नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतला. त्यामुळं नाशिकचे मंत्री दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आमच्या नेत्यांवर अन्याय झाला : पालकमंत्रीपद देताना त्यांनी आमच्या लोकांचा विचार करायला होता. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारणा करणार आहोत. शिवसेनाचे (शिंदे) मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळालं नाही. ते आमच्या पक्षाचे जुने शिलेदार आहेत. त्यामुळं त्यांना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं. नक्कीच त्याच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याचं कारण जाणून घेणार आहोत असं गुलाबराव पाटील म्हणाले.
जी जबाबदारी दिली ती पुढे नेऊ : पालकमंत्रीपद डावलले अशातला काही भाग नाही. जी जबाबदारी दिली ती पुढे नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं. मला या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली ती आम्ही पुढे नेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संवाद साधून निर्णय घेतला आहे. ते निर्णय पुढे नेणे आमची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पद डावलल्यानंतर दादा भुसे यांनी व्यक्त केली.
आमचा पालकमंत्री हवा : "राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. त्यामुळं नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री आमचा असावा ही आमची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री असल्यास त्याचा जिल्ह्याला फायदा होतो. त्याला जिल्ह्यातील आवाका जिल्ह्याचे प्रश्न माहिती असतात. दुसऱ्या जिल्ह्यातील पालकमंत्री असल्यास तो कधी येतो कधी येत नाही, याबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेतील" असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
लवकरच गुड न्यूज कळेल : "दादा भुसे यांनी जेव्हा शिक्षण मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून ते वाड्या पाड्यात फिरत आहेत. लवकरच शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसून येईल. त्यामुळं सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळालं पाहिजे. लवकरच तुम्हाला गुड न्यूज कळेल" असं नाशिक शिवसेना उपनेते प्रमुख अजय बोरस्ते म्हणाले.
हेही वाचा -