मुंबई- शासकीय यंत्रणेकडून प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू असताना पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन कोण करणार, यावरून दोन जिल्ह्यांसाठी घोळ सुरू आहे. राज्य सरकारनं पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्यानंतर महायुतीमध्ये धुसफुस सुरू आहे. त्यानंतर राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड स्थगित केली आहे.
भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे, पाणीपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती राज्य सरकारनं स्थगिती दिली. त्याचबरोबर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केलेल्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेकडून आग्रह करण्यात आला आहे. पालकमंत्री पद न मिळाल्यानं केवळ नाराजीच नाही तर महायुतीमधील संबंध बिघडतील, असे शिवसेनकडून भाजपाला संकेत देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्र्यांकडून उघड नाराजी व्यक्त - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत. तर मंत्री भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही आहेत. तटकरे यांना पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. गोगावले यांना पाठिंबा दर्शवत त्यांची पालकमंत्री पदी नियुक्ती व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामे सोपवले. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळायला हवे होते, अशी भूमिका मांडली. त्यांना पालकमंत्री पद का मिळाले नाही, याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून कारण जाणून घेणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी पालकमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा दिला होता, असे गोगावले म्हणाले होते. हा निर्णय पटणारा नाही, अशा शब्दात मंत्री गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.
दावोसवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश-पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून असलेल्या वादाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून नाशिकसह रायगडचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली. शिवसेनेकडून होणारा प्रखर विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार दावोस येथील परिषदेसाठी विदेशात गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासनाला नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती स्थगिती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सामान्य प्रशासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली.
बीडचे पालकमंत्री असताना सर्वाधिक विकास-पंकजा मुंडे- "मी बीडची लेक असल्यानं बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली असती तर अधिक आनंद झाला असता. बीडकरांनादेखील आनंद झाला असता", अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाच्या निवडीनंतर दिली. निर्णयावर कोणतीही असहमती न दाखवता पूर्ण ताकदीनं काम करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. "जालना आणि बीडमधील पक्ष संघटना, नागरिकांसाठी दुप्पट काम करावे लागेल", असे त्यांनी म्हटलं. बीडच्या विकासाबाबत विरोधकांडून प्रश्न उपस्थित केले जात असताना त्यांनी पालकमंत्री म्हणून काम करताना सर्वाधिक विकास केल्याचा दावा केला.
दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असणार? भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्यामुळे पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या. राज्य सरकारनं शनिवारी ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्री आणि सह पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा प्रथमच महायुतीमधील मंत्र्यांमध्ये मतभेद होऊ नये, याकरिता सह पालकमंत्री पदाची नियुक्त्यादेखील जाहीर केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाला कोणते मंत्री ध्वजवंदन करणार आहेत, याची महायुती सरकारनं अधिसूचना काढली आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती स्थगिती केल्यानं तिथे कोणते पालकमंत्री ध्वजवंदन करणार आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे
हेही वाचा-