पाटणा/नवी दिल्ली Narendra Modi Nitish Kumar : बिहारमध्ये गेल्या 72 तासांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, नितीश कुमार यांनी रविवारी, 28 जानेवारीला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या नव्या एनडीए सरकारचं अभिनंदन केलं.
पंतप्रधानांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं - बिहारमध्ये स्थापन झालेलं एनडीए सरकार राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मी मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारजी आणि सम्राट चौधरीजी आणि विजय सिन्हाजी यांचं उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की ही टीम राज्यातील माझ्या कुटुंबियांची पूर्ण समर्पणानं सेवा करेल.
सकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला : नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व नेत्यांनी नितीश कुमारांना कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी महाआघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याबद्दलही नितीश कुमारांचं अभिनंदन केलं होतं.
बिहारमध्ये आतापर्यंत काय घडलं :मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर महाआघाडीचं सरकार पडलं. यानंतर संजय झा जेडीयूचा मेसेज घेऊन भाजपा कार्यालयात पोहोचले आणि भाजपाला पाठिंबा मागितला. नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा औपचारिक निर्णय भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. नितीश कुमारांना आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं देण्यात आली. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा मांडला. रविवारी संध्याकाळी एनडीए सरकारचा शपथविधी झाला.
हे वाचलंत का :
- नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
- 'बिहारचे योगी' बनले नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत सम्राट चौधरी?
- नितीश कुमार यांच्यासोबत 'या' आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास