मुंबई Omega Christian Mahasangh : काही दिवसांपूर्वीच शासनाने ब्राह्मण समाजासाठी 'परशुराम आर्थिक विकास महामंडळा'ची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर आता ख्रिश्चन समाजाने देखील आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवला आहे. ख्रिश्चन समाजासाठी देखील एक स्वतंत्र 'आर्थिक विकास महामंडळ' असावं ही जुनी मागणी ख्रिश्चन समाजाकडून पुन्हा एकदा सरकार समोर ठेवण्यात आली आहे. राज्यात मराठी नावाचे ख्रिश्चन बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, याबद्दल फारसे कोणाला माहिती नाही. पंडिता रमाबाई यांच्या नावाने ख्रिश्चन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी, ओमेगा ख्रिश्चन समाजाने केलीय.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार : राज्यात साधारण 30 लाखांहून अधिक मराठी नावाचे ख्रिश्चन बांधव असल्याचं ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आनंद शिंदे सांगतात. याला देखील एक इतिहास आहे. आपल्या देशावर मुघलांप्रमाणेच पोर्तुगीज, डच, इंग्रज यांनी देखील राज्य केलं. या प्रत्येकाचा कालखंड वेगळा होता. परंतु, मुघल वगळता पोर्तुगीज, डज, इंग्रज यांचा साधारण समकालीन कालखंड मानला जातो. याच काळात आपल्या देशात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. यात महाराष्ट्र देखील मागे नव्हता. पंडिता रमाबाई या यापैकीच एक होत्या.
मराठी लोकांनी स्वीकारला ख्रिश्चन धर्म : ज्या काळात आंतरजातीय विवाह समाजात गुन्हा मानला जायचा, त्या काळात पंडिता रमाबाई यांनी आपला ब्राह्मण धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. या कालखंडात अनेक महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मात्र, त्यांची नावे ही मराठीच राहिली. असे साधारण 30 लाखांहून अधिक मराठी नावाचे ख्रिश्चन बांधव आज आपल्या राज्यात आहेत. तर, साधारण पाच टक्के इंग्रजी नावाचे ख्रिश्चन बांधव आपल्या राज्यात असल्याचं ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आनंद शिंदे सांगतात.