सिंधुदुर्ग Lok Sabha Election 2024: भाजपाचे सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असं मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणं करू नका. नांदा सौख्यभरे! असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात भाजपाच्या संघटनात्मक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना राणे बोलत होते.
अबकी बार चारसो पार: उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले, हा मेळावा पक्ष हितासाठी आहे. मोदीजींनी कार्यकर्त्यांना जी हाक दिलीय, अबकी बार चारसो पारचा जो संकल्प आहे, तो पूर्ण करण्यासाठी हा मेळावा आहे. आपलं काम लोकहिताचं होतं की नाही ते या निवडणुकीत कळणार आहे. मी आताच कोअर कमिटीची बैठक अटेंड करून आलोय. सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत, असं मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका. नांदा सौख्यभरे! असं आवाहन, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केलंय.
उद्धव ठाकरे केली टिका : राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. अजून महायुतीचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे, तरी का घाबरता एवढे? असा सवाल राणे यांनी महाविकास आघाडीला केलाय. 1989 नंतर जिल्ह्यात विकासाचा कोणता प्रकल्प विरोधकांनी आणला ते सांगा, असे विचारून नारायण राणे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील टीका केली. बौद्धिक आणि विकासात्मक बोला. कणकवलीचा एक माणूस केंद्रात मंत्री आहे याचे विरोधकांना आणि पत्रकारांना कौतुक नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.