मुंबई Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय महाअधिवेशन कोल्हापुर येथे संपन्न झालं. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीवरून निशाणा साधलाय. तर उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात मातोश्री येथे बंद खोलीत चर्चा झाली नसल्याचा मोठा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं? :महाविकास आघाडी सरकारकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीत गेले होते. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी खोचक टीका केली. तसेच बंद खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालीच नाही, असा दावाही शिंदे यांनी केलाय. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीला काहीही बोलण्याचं लायसन्स महाराष्ट्राने दिलं नाही. अधिवेशनात ते बोलत असताना लोक उठून चालले होते याचा व्हिडिओ समोर आलाय."
खोलीत काय चर्चा झाली? : बंद दाराआड चर्चा होत असताना त्या ठिकाणी तुम्ही मातोश्रीवर उपस्थित होता का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच त्यावेळेस मी मातोश्रीवर उपस्थित होतो आणि कोण होते, कोण नव्हते हे माहिती आहे, असा देखील खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लागवला आहे. त्यावेळी ते पक्षाचे नेतेही नव्हते, आम्ही सर्वांनी मिळून त्यांना पक्षाचा नेता केला, असंही सांगायला ते विसरले नाही. यावेळी भाजपाचे नेतेही होते ते गुलाम आणि नोकर झाले असून सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळं अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करत आहेत. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत काय चर्चा झाली ती शाह यांनी सांगावी, असंही राऊत म्हणाले.