प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील पुणे Manoj Jarange On Lok Sabha Election: यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. सरकार निवडणूक घेणारच नाही कारण मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो पर्यंत सरकार निवडणूक घेणार नाही. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात जरांगे बोलत होते.
पुन्हा एकदा महादिवाळी साजरी होणार :यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा खूप वर्षापासूनचा सुरू आहे. आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. 39 लाख लोकांना त्या वितरित करण्यात आल्या आहेत. मुंबईपर्यंत मोर्चा हा 'सगेसोयरे'साठी काढण्यात आला होता. सरकारने राजपत्रित अधिसूचना 27 तारखेला काढली. येत्या पंधरा दिवसात याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. मुंबईत शासनाने निर्णय दिल्यानंतर सर्वत्र दिवाळी साजरी झाली. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत प्रमाणपत्र मिळालं की, राज्यात पुन्हा एकदा महादिवाळी साजरी होणार आहे.
माणसाच्या येणाऱ्या अडचणी वाचल्या : मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, मला नेतृत्व नको होतं. मी मुलांचं पाहात होत की शिक्षणात एक जरी टक्का कमी आला तरी काय वेदना होतात. आपण आंदोलन केलं पाहिजे पण डाग लागता कामा नये याचा विचार देखील मी करत होतो. मी एक शेतकरी कुटुंबातील असून कोणताही राजकीय वारसा मला नाही. गेल्या 22 वर्षापासून मी समाजासाठी काम करत आहे. मी 12 वी शिकलेलो आहे. मी जास्त पुस्तक नव्हे तर दैनंदिन जीवनात माणसाच्या येणाऱ्या अडचणी वाचल्या आणि ते सोडण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचा लढा सुरू करण्यासाठी गोदा पट्ट्यातून सुरुवात केली. 11 तालुक्यातील 123 गावं एकत्र केली. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा असं सांगत शंभर टक्के ती गावं बाहेर काढली. तेथून खऱ्या अर्थाने आरक्षणाच्या लढ्याला सुरूवात केली.
मराठा आरक्षणाचा टर्निंग पॉईंट होता का : अंतरवाली मध्ये जो काही गोळीबार, लाठीचार झाला तो मराठा आरक्षणाचा टर्निंग पॉईंट होता का? त्यावर पाटील म्हणाले की, तो आमच्यासाठी टर्निंग पॉईंट नव्हता. आमच्या आई बहिणींचं डोकं फोडून आरक्षण आम्हाला महत्त्वाचं नव्हतं. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या आयुष्यात कधीही बघितलं नाही. ती घटना टर्निंग पॉईंट नव्हे तर एक डाग होता.
हेही वाचा -
- मराठ्यांनी ओबीसी बांधवांचा घास हिरावून घेतला, अधिसूचनेला विरोध; छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
- मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; मनोज जरांगे पाटलांची घोषणा
- जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडलं उपोषण