महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

आघाडीत बिघाडी, इंडिया आघाडी टिकवण्याचं नेत्यांपुढे आव्हान

India Alliance News : भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र आता इंडिया आघाडीतून महत्त्वाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांनी सवता सुभा मांडला आहे. पाठोपाठ अन्य काही नेते नाराज असल्याची चर्चा असल्याने आता इंडिया आघाडी समोर आघाडी टिकवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. जाणून घेऊया घटक पक्ष आणि जाणकारांचं काय म्हणणं.

India Alliance
इंडिया आघाडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 5:42 PM IST

Updated : Jan 25, 2024, 6:37 PM IST

मुंबई India Alliance News: भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेवर येऊ नये आणि भारतीय जनता पार्टीच्या दडपशाहीच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट करीत, इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र ही इंडिया आघाडी सुरुवातीपासूनच नाराजीच्या ग्रहणाने ग्रासलेली आहे. इंडिया आघाडीतील काही नेते हे नेतृत्वावरून तसेच इंडिया आघाडीत मिळणाऱ्या मानावरून नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्या असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे.

वंचित अद्याप निमंत्रण नाही : ममता बॅनर्जी या प्रत्यक्ष बाहेर पडल्या नसल्या तरी त्यांनी सवता सुभा मांडल्यामुळं, इंडिया आघाडी काहीशी कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतय. तर महाराष्ट्रात इंडिया आघाडीत येऊ पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीलाही अद्याप निमंत्रण देण्यात आलेलं नाही आणि स्थानही देण्यात आलं नाही. त्यामुळं इंडिया आघाडीत समाविष्ट होण्यास इच्छुक असलेल्या वंचितनेही नाराजीचा सूर लावला आहे.



नाराजीचा फरक पडणार नाही :यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद म्हणाले की, ममता बॅनर्जी या केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. मात्र त्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याचं म्हणाल्या नाहीत. त्याशिवाय नितीश कुमार हे सुद्धा इंडिया आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा असली तरी, जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के सिताराम म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीत सहभागी आहोत. वास्तविक नीतिश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या महा गटबंधनची सुरुवात केलीय. त्यामुळं ते बाहेर पडण्याचा प्रश्न येत नाही. जागा वाटपासंदर्भात काही अडचणी असतील तर त्या चर्चेतून सोडवल्या जाऊ शकतात. महाराष्ट्रातही आम्ही महाविकास आघाडीला तेच सांगितलंय. कारण त्यांचं अजून जागा वाटपाचं ठरलेलं नाही. तुम्ही आधी तिघांमध्ये जागा वाटप करा. 48 जागांचं तीन पक्षांमध्ये वाटप करा. आम्हाला हव्या असलेल्या जागा ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाशी आम्ही चर्चा करू.



भाजप तोडण्याचा प्रयत्न करत आहे: यासंदर्भात बोलताना आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. धनंजय शिंदे म्हणाले की, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही वृत्तीमुळं गेल्या दहा वर्षात देशाचं नुकसान झालं आहे. त्या सरकारच्या विरोधातला असंतोष या जनतेमध्ये आहे. म्हणून इंडिया आघाडीत सगळे घटक पक्ष एकत्र आले आहेत. तृणमूल महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि गेल्या सहा महिन्यांमध्ये इंडिया आघाडीची बेंगलोर, मुंबई, दिल्ली, बिहार या ठिकाणी बैठक झाली आहे. इंडिया आघाडी ही जनतेची आघाडी आहे. 135 कोटी लोकांची आघाडी आहे. या सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून दिवसेंदिवस ही आघाडी अत्यंत सशक्त बनत चाललेली आहे. आघाडीचं राजकारण हे अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.




आघाडी टिकवण्याचे आव्हान : इंडिया आघाडी लोकसभेपर्यंत टिकणार का अशी चर्चा आता सुरू झाल्यानंतर, या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड म्हणाले की, भाजपाला 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत करण्याच्या ईर्षेतून इंडिया आघाडीचा जन्म झाला आहे. या आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसनं स्वबळावर निवडणूका लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. इंडिया आघाडीत तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या आधीपासूनच त्यांना मानाचं पान मिळत नसल्यानं नाराज आहेत. आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांची नाराजी ठळकपणे समोर आली होती. पश्चिम बंगाल सारखं मोठं राज्य ताब्यात ठेवण्यासाठी भाजपानं कंबर कसली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यातूनच ममता बॅनर्जी यांची ताकद दिसून येते. त्यामुळं ममता बॅनर्जी यांचं या आघाडीत नसणं म्हणजे इंडिया आघाडी निश्चित कमकुवत झाली आहे. इंडिया आघाडीनं अजूनही त्यांचा नेता निवडलेला नाही, समन्वय समिती आहे मात्र, ही समिती देखील मित्र पक्षांची नाराजी दूर करू शकलेली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुका या आघाडीसाठी अस्तित्वाचा विषय असल्यानं सध्या तरी आघाडी टिकेल. त्यासाठी आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचं मोठं आव्हान आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.



हे केवळ मतभेद मनभेद नाही : ममता बॅनर्जी यांनी जरी काहीशी वेगळी भूमिका घेतली असली तरी त्या आमच्या मार्गदर्शिका आहेत. आमच्यात काही मतभेद असू शकतात. परंतु मनभेद नाहीत असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. इंडिया आघाडीचं प्रत्येक राज्याचं जागा वाटपाचं गणित वेगळं आहे. त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये जरी त्या वेगळ्या पद्धतीने लढल्या तरी, त्यांचे जे उमेदवार निवडून येतील ते इंडिया आघाडी बरोबरच राहतील, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केलाय. ममता बॅनर्जी यांच्यावर आमचं सर्वांचं प्रेम आणि विश्वास आहे. गेल्या दहा वर्षापासून संसदेमध्ये त्या आमच्यासोबत आहेत. येणाऱ्या काळात आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि देशाची सेवा करून असंही सुळे म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. बंधूंना मिळालेल्या ED नोटीसीवरुन संजय राऊत कडाडले, नेमकं काय म्हणाले? वाचा
  2. महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक; 'वंचित'चा संजय राऊतांवर हल्लाबोल, निमंत्रण नसल्याचं केलं स्पष्ट
  3. सर्व्हेक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची यादी जाहीर, नवीन मतदारांमध्ये झाली वाढ
Last Updated : Jan 25, 2024, 6:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details