पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामुळं राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. पुण्यात ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी ईव्हीएम घोटाळ्यावरून आत्मक्लेष आंदोलन पुकारलं होतं. बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
पराभवाचं खापर ईव्हीएमवर : यावेळी अजित पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीचा निकाल हा विरोधकांच्या एवढ्या जिव्हारी लागला आहे की, ते तो निकाल सहन करू शकत नाहीत. त्यामुळं आता ते ईव्हीएममध्ये दोष काढत आहेत. जर वेगळा निकाल लागला असता, तर यावर कोणीही काहीही बोललं नसतं. तसंच सुप्रीम कोर्टानं देखील ईव्हीएमबाबत सांगितलं आहे की, अशा पद्धतीनं तक्रार करता येत नाही. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. स्वतःच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत आहेत."
मुख्यमंत्री त्यांचाच होणार : मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "अंदाजे पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ होणार आहे. त्यानंतर आम्ही एकत्र बसून खाते वाटप करणार. तसंच आमच्यात कुठंही रस्सीखेच नसून जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील तो मान्य असणार. भाजपाच्या 132 जागा निवडून आल्यानं मुख्यमंत्री त्यांचाच होणार." अजित पवार यांच्या या विधानानं शिवसेनेत खळबळ उडण्याची शक्यता आहे.