नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राडा झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गिते यांचे भाऊ आणि पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप गिते यांनीच केला. या वाहनातून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत महायुती उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी वाहनावावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तालयात जात पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली.
गणेश गिते यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी : नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा भाजपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडं भाजपातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले गणेश गिते यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचे बंधू आणि पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांच्या वाहनातून पैसे वाटप होत असल्याचं म्हणतं, महायुतीचे उमेदवार ढिकले यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप गिते यांनी केला. तसंच या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचंही गिते समर्थकांनी सांगितलं.