मुंबई : जागावाटपावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक वाद शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. यानंतर पुन्हा शनिवारी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होती. या बैठकीला सर्व नेत्यांनी हजेरी लावली. बैठक झाल्यानंतर सर्व नेत्यांनी एकत्र येत महायुतीवर जोरदार टीका केली. तसंच जागावाटपावरुन आमच्यात कोणताही वाद नसल्याचं या नेत्यांनी दाखवून दिलं.
बोगस मतं आणली : "महायुतीला आम्ही 'लफंगे' म्हणतो आणि त्यांनाच घटनेनं विशेष अधिकार दिले आहेत. या लोकांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. निवडणूक आयोगानं ॲप बनवून लोकांची मतं कमी करून बोगस मतं जोडण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रात सुमारे 10 हजार बोगस मतं जोडली जात आहेत. आता महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे," असं म्हणत खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला.
महायुतीला पराभवाची भीती : "संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणं महायुतीचे सरकार निवडणूक हरण्याच्या भीतीनं मूळ लोकांची नावं निवडणुकीतून काढून टाकत आहे आणि बोगस मतदारांचा समावेश करत आहे. आम्ही निवडणूक आगोगाला पत्र लिहिलं आहे. निवडणुकीत पारदर्शकता आम्हांला दिसत नाही. निवडणूक आयोग मोदींच्या पायाखाली बसलेला दिसतोय," असं म्हणत नाना पटोलेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.