मुंबई- महायुतीतील बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, महादेव जानकर यांचा रासप आणि ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम या घटक पक्षांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व घटक पक्षांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत मतभेद-विधानसभा निवडणुकीला जेमतेम दोन ते अडीच महिन्याचा कालावधी उरलेला असताना महाविकास आघाडी अथवा महायुती या दोन्ही पक्षांतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यातच जागावाटपाचा तिढा सोडवताना महायुतीला घटक पक्षांनाही योग्य न्याय द्यावा लागणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर सामील झाल्यानं जागा वाटपात हिस्सेचे तीन वाटेकरी झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये कशा पद्धतीने रस्सीखेच होते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेलाच आहे. त्यातच महायुतीमधील प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, रासपचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची नाराजी समोर आली आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत मतभेद होण्याची शक्यता-घटक पक्षांच्या नाराजीनं महायुतीचे विशेष करून भाजपचे नेते धास्तावले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये १३ घटक पक्षांना जागा दिल्या जाणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. तसेच जो पक्ष जागा जिंकेल ती जागा त्या पक्षाला देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. बावनकुळे यांनी घटक पक्षांना खुश करण्यासाठी अशी घोषणा जरी केली असली तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुन्हा महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. एक नवीन फॉर्म्युला तयार होऊन जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महायुती बऱ्यापैकी बॅक फुटवर-लोकसभेत बसलेला फटका भरून काढण्यासाठी महायुतीनं 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (MMLBY) जाहीर करत विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. परंतु बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचार त्या पाठोपाठ राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा या कारणाने महायुती बऱ्यापैकी बॅक फुटवर गेली. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यांमध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला असून त्यांची चाचपणी सुरू आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये याबाबत २८ ऑगस्ट रोजी बैठकसुद्धा पार पडली. या बैठकीत प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू उपस्थित होते. यासोबतच महादेव जानकर यांच्या रासप, ज्योती मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षानं स्वतंत्र भूमिका घेतली असल्याकारणानं त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येणार आहे. या कारणाने भाजपानं आता सावध पवित्रा घेतला आहे. भाजपानं घटक पक्षांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.