मुंबई- मागील आठवड्यात प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील घरात जीवघेणा हल्ला झाला होता. मध्यरात्री दोन ते अडीच वाजता झालेल्या हल्ल्यात सैफ अली खान रक्तबंबाळ झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी सर्वांचीच तारांबळ उडाली होती. यावेळी पार्किंगमधून गाडी आणण्यास उशीर झाल्याने तिथेच उपलब्ध असलेल्या एका रिक्षाचालकाच्या रिक्षात बसवून सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. भजनसिंग राणा असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे वेळेवर सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवल्यामुळे रिक्षाचालक भजनसिंग राणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असताना आता मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने रिक्षाचालक भजनसिंग राणाची भेट घेतलीय. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भजनसिंग राणा ठरला सैफसाठी देवदूत : 16 डिसेंबर (गुरुवारी) मध्यरात्री सैफ अली खानवर रात्री दोन ते अडीच वाजता हल्ला झालाय. यावेळी सैफ अली खानच्या घरातील सर्वंच सदस्य घाबरले होते. सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले होते. चार हातावर अन् एक मानेवर आणि दुसरा पाठीच्या मणक्यात असे वार करण्यात आले होते. यातील दोन वार अत्यंत गंभीर होते. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खान रक्ताने माखलेला होता. अशा परिस्थितीत सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तातडीने गाडी हवी होती. पण इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये गाडी घेऊन आणण्यास सैफ अली खानच्या मुलाला उशीर झाला होता. त्यामुळे इमारतीच्या समोर उभा असलेल्या रिक्षाचालक सैफ अली खानच्या मदतीस धावून आला आणि त्याने कोणत्याही क्षणाची वाट न पाहता सैफ अली खानला तात्काळ लीलावती रुग्णालयात पोहोचवले. या कामगिरीमुळे भजनसिंग राणा या रिक्षाचालकाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, त्याचा सत्कारदेखील करण्यात आलाय. ही बाब लक्षात घेऊन सैफ अली खानने आपणाला वेळेवरती रुग्णालयात पोहोचवणाऱ्या आणि आपल्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षाचालक भजनसिंग राणाची आज भेट घेत त्याचे आभार मानलेत.
भजनसिंग राणाला 11000 रुपयांचं बक्षीस : दुसरीकडे जेव्हा मी सैफ अली खानला रक्तबंबाळ होताना पाहिले, तेव्हा मला माहीत नव्हते की, हा एक अभिनेता आहे. मी रुग्णालयात नेल्यानंतर मला हा अभिनेता असल्याचं समजले. पण जेव्हा मी पाहिले तेव्हा घाबरलो होतो, मी पुढे गेलो तर मला पोलीस चौकशीसाठी बोलावतील, असा डोक्यात विचार आला. पण आपण एका जखमी व्यक्तीला मदत केली आणि त्याचा जीव वाचवला, आपण गरजू व्यक्तीच्या कामी आल्यामुळे आपल्याला आनंद आणि अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक भजनसिंग राणा यांनी दिली होती. दरम्यान, रिक्षाचालक भजनसिंग राणा याने दाखवलेल्या तत्परतेमुळं आणि हजरजबाबी कार्यामुळं सैफ अली खानला वेळेवर उपचार मिळाले. याची दखल घेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी याने रिक्षाचालक भजनसिंग राणाला रोख रक्कम 11000 रुपये देऊन त्याचा सत्कार केला होता. यानंतर आज अभिनेता सैफ अली खानने रिक्षाचालक भजनसिंग राणाची भेट घेतलीय. दरम्यान या दोघांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रिक्षाचालक भजनसिंग राणाचे कौतुक करण्यात येतंय.
हेही वाचा :