जळगाव : जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या तर खऱ्या, मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं यातल्या अनेकांना उडवलं आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आमच्या प्रतिनिधीनं किमान ८ जण ठार झाल्याचं कळवलं आहे.
बंगळुरू एक्सप्रेसखाली आले प्रवासी : रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस जागेवर उभी होती, तेव्हा आगीची अफवा पसरली आणि काही जणांनी उड्या मारायला सुरूवात केली. तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती, उड्या मारल्यानंतर प्रवासी बंगळुरू एक्सप्रेसखाली आले. संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. तसंच जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
कसा झाला अपघात : पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊवरून मुंबईला येत होती, तर बंगळुरू एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात चालली होती. तेव्हाच पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली, यानंतर पुष्पक एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली. आगीच्या अफवेनंतर प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून धडाधड उड्या मारायला सुरूवात केली, पण समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत असल्याचं प्रवाशांना दिसलं नाही आणि हा विचित्र अपघात झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट - या अपघातानंतर डावोस दौऱ्यावर असल्याल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे त्यांच्या सहवेदना व्यक केल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
तामिळनाडूमध्ये भीषण रेल्वे अपघात; प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकली