Health Benefits Of Tomato: जेवण रुचकर होण्यासाठी भारतीय लोकांच्या स्वयंपाक घरात टोमॅटो आवर्जून वापरला जातो. टोमॅटो शिवाय जेवणाची चव अपूर्णच. टोमॅटोमुळे जेवणाची चव वाढते. परंतु, भाजीला चव प्रदान करणे हे एकच टोमॅटोचे वैशिष्ट नसून त्यात अनेक आरोग्यवर्धक फायदे दळलेले आहेत. टोमॅटोच्या या फायद्यामुळे त्याला सुपरफूडचा देखील दर्जा मिळालेला आहे. टोमॅटो फोलेट, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि सी, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, थायामिन, व्हिटॅमिन बीने समृद्ध आहे. ज्यामुळे शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात. जाणून घेऊया टोमॅटो खाण्याचे आरोग्यविषयक फायदे.

- टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
- हाडांसाठी फायदेशीर: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक आढळतात. जे हाडांना निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोचा समावेश करू शकता. हे तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा करण्यास मदत करते.
- हृदय निरोगी ठेवते: टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन हृदयविकाराचा धोका टाळू शकते. जर तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोचा नियमित समावेश करत असाल तर ते कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे.

- पचनासाठी उत्तम: टोमॅटो खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तसंच टोमॅटो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. काविळसारखा आजार कमी करण्यासाठीही टोमॅटो गुणकारी आहे.
- डोळ्यांसाठी चांगले: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात आढळते. परिणामी, दृष्टी सुधारते. टोमॅटो खाल्ल्याने तुम्ही रातांधळेपणा टाळू शकता.
- त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. टोमॅटोच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. तसंच, तुम्ही सॅलडमध्ये टोमॅटो समाविष्ट करू शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए तुमचे केस निरोगी ठेवण्यास मदत करते.

- रक्तातील साखर नियंत्रित करते: टोमॅटोमध्ये क्रोमियम आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहग्रस्तांनी त्यांच्या आहारात टोमॅटोचा समावेश करावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.
- प्रतिकारशक्ती मजबूत करते: टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी चांगलं आहे. यासाठी तुम्ही टोमॅटोचा रस पिऊ शकता. यामध्ये असलेले गुणधर्म तुमच्या शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ