मुंबई:महायुतीनं विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं तरी मुख्यमंत्री कोण? यावर अद्याप महायुतीकडून आणि भाजपाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडं कोणती जबाबदारी असणार, याबाबत अजूनही महायुतीत संभ्रमावस्था आहे. अशा राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सूचक अशी एक्स मीडियावर पोस्ट केली आहे.
महायुतीमधील राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा केली. अजित पवार यांच्याकडे यापूर्वी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. महायुती सरकार स्थापन होताना अजित पवाराकंड पुन्हा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रक्ते अमोल मिटकरी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, "जंगल मे सन्नाटा छायेगा l जल्द ही शेर वापस आयेगा...."
महायुतीत संभ्रावस्था -बहुमतात असलेल्या महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसह मंत्रिमंडळाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते पद दिले जाणार, याबाबत अजूनही महायुतीकडून घोषणा करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांची एक्स मीडियातील पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईत आज पुन्हा बैठक-काळजीवाहू मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाला पाठिंबा असेल, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा निवड होणार नाही, हे जवळपास निश्चित असल्याचं चित्र आहे. ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड व्हावी, अशी भाजपाच्या नेत्यांची मागणी आहे. असे असूनही राज्यातील राजकीय समीकरणे पाहता भाजपाकडून अद्याप त्यांच्या नावाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दिल्लीतील अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या बैठकीनंतर पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपद आणि नव्या मंत्रिमंडळाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यात येणार-महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सरकार स्थापन करण्यास आणि मुख्यमंत्रिपद जाहीर करण्यास विलंब होत आहे. यावरून शिवेसनेचे खासदार (उद्धव ठाकरे) संजय राऊत, खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या (एसपी) सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर टीका केली. महाविकास आघाडीच्या टीकेला भाजपा नेते सुधीर मुनंगटीवार यांनी उत्तर देताना म्हटले," सरकार स्थापनेत 2004 मध्ये 15 दिवस, 2009 मध्ये 14 दिवस आणि 2014 मध्ये 11 दिवसांचा विलंब झाला होता. अशा स्थितीत पाच दिवसांचा विलंब म्हणणे योग्य नाही. 20 दिवस झाले असते तर परिस्थिती वेगळी असती. शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ याच आठवड्यात होणार आहे".
हेही वाचा-
- अमित शाह एकनाथ शिंदे बैठक; चर्चा सकारात्मक, मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार मुंबईत, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती
- महाराष्ट्रात फडणवीस नाही तर कोण? वाचा भाजपाचं धक्कातंत्र आहे तरी काय