मुंबई MNS on Assembly Election :आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. त्यामुळं राज्यात मनसे किमान 200 जागा लढवण्याची शक्यता मनसे नेते वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नारा : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मदत करत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण साथ देत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रात महायुतीसाठी प्रचार सभाही घेतल्या. मात्र, आता विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीसोबत न जाता पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील 'शिवतीर्थ' इथं झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला. मुंबईतील शिवतीर्थ या मनसेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला राज्यातील मनसेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला असून हा आढावा घेतल्यानंतर राज्यात मनसेसाठी अनुकूल वातावरण असल्याचं समोर आलं आहे, असं खेडेकर यांनी सांगितलं.