ठाणे- जादूटोणासह काळी जादू अशा अंधश्रद्धांमुळे महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पती आणि मुलावर संकट असल्याचं दाखवून भोंदू मांत्रिकानं ४५ वर्षीय महिलेची ८ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. धक्कादायक बाब म्हणजे जादूटोणा आणि पूजा अर्चा करण्यासाठी मृतदेह लागणार असल्याचा बहाणा करून भोंदू मांत्रिकानं महिलेकडून लाखो रुपये उकळले आहेत. हजरत बाबा , (वय ४५, रा. टकाला इमारत, अवचितपाडा भिवंडी ) असे अटक केलेल्या भोंदू मांत्रिकाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला मिल्लतनगर भागातील एका इमारतीत राहते. २०२३ पूर्वीपासून तिचा पती सतत आजारी राहत असल्यानं औषध उपचार सुरू होते. त्यातच महिला राहत असलेल्या भागातील अवचितपाडा येथील मांत्रिक हजरत बाबानं महिलेच्या दुकानात जाऊन संपर्क साधला. त्यानंतर पतीचं आणि मुलाचं आजारपण ठीक होण्यासाठी ऑक्टोबर २०२३ रोजी मांत्रिक पुन्हा महिलेच्या दुकानात गेला. त्यावेळी त्यांच्या आजारी असलेल्या पती आणि मुलावर काळी जादू केल्याचं त्यानं भासविल. पती आणि मुलाच्या डोक्यावरून अंडे ओवाळून घेण्यास सांगत अंडीमधून हातचलाखीनं लोखंडी खिळा काढून दाखविला. यातून त्यानं महिलेचा विश्वास संपादन केला.
व्याजानं पैसे देऊन लुटले!पती आणि मुलावरील काळी जादूचा नाश करण्यासाठी मृतदेह आणून त्यावर मंत्रतंत्र आणि अघोरी विद्या करावी लागेल, असे भोंदू मांत्रिकानं तक्रारदार महिलेला सांगितलं. मृतदेह मालेगाव या ठिकाणी असल्याचं सांगत १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचं सांगत महिलेनं सुरुवातीला नकार दिला. मात्र, त्यानंतर ६ लाख रुपये भोंदू मांत्रिकाला दिले. काही दिवसांनी संपर्क करून आणखी दोन लाख रुपयांची मांत्रिकानं मागणी केली. त्यावेळी महिलेकडे पैसे नव्हते. यामुळं भोंदू मांत्रिकानं त्याच्या जवळील तीन लाख रुपये त्या महिलेला व्याजानं दिले.
काही तासातच आरोपीला अटक- मृतदेह आणि पूजा पाठ करण्याच्या नावानं ऑक्टोबर २०२३ रोजी ते १० जानेवारी २०२५ पर्यत वेळोवेळी भोंदू मांत्रिकानं काळी जादूचा नाश करण्यासाठी सुमारे ८ लाख ८७ हजार रुपये त्या महिलेकडून घेतले. त्याचप्रमाणं मांत्रिकानं तीन लाख रुपयांवरील दोन वर्षे व्याजही पीडितेकडून घेतले. मात्र, पती आणि मुलाच्या आजारपणात काहीच फरक पडत नसल्याचं लक्षात आल्यावर महिलेनं शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन भोंदू मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भोंदू मांत्रिकाला काही तासातच गजाआड केलं आहे. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठा आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलीस पथकानं भोंदू मांत्रिकाला भिवंडीतून अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा-