मुंबई :महाराष्ट्र विधानसभेच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला (Maharashtra Legislative Assembly) आज (7 डिसेंबर) मुंबईत प्रारंभ झाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
नितेश राणेंची जोरदार टीका : नितेश राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्याचं काम त्यांच्याच पेपरमधून केलं जातय. महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया आणि दामिनी पथकाचा हेल्पलाईन नंबर बंद असल्याची बातमी त्यांच्या पेपरमध्ये छापण्यात आली. आतापर्यंत सामना हा त्यांचं मुखपत्र असल्याचं वाटत होतं. मात्र, आता त्यांच्याच पेपरमधून त्यांच्याविरोधात बातम्या दिल्या जात आहेत", असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
पुढं ते म्हणाले, "या संदर्भातील हेल्पलाईनचा 2022 मध्ये जीआर काढण्यात आला होता, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. सामनातील वृत्त देणाऱ्या संजय राऊत यांचा पगार किती दिवस चालू ठेवावा हे रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी ठरवावं", असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला. राज्यातील माता भगिनींना पूर्ण मदत आणि सुरक्षा महायुती सरकार देणार, अशी ग्वाही यावेळी नितेश राणे यांनी दिली. तसंच आम्ही स्वप्ना पाटकरनं कॉल केला तरी मदत करु, असाही चिमटा राणे यांनी काढला.