मुंबई Ramesh Chennithla : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. केंद्र सरकारची धोरणं याला कारणीभूत असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलीय. या सर्वांचा रोष केंद्र आणि राज्य सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केलाय. लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज थांबला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळं शेवटच्या चौथ्या टप्प्यातही जनता महाविकास आघाडीला निश्चितच साथ देईल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलाय.
शेतकरी आणि बेरोजगारांचा रोष : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, ही परिस्थिती संपूर्ण देशात आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, याला केंद्र सरकारची नीती कारणीभूत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं वाढत आहेत. हे केंद्र सरकारचं अपयश आहे. राज्यातही त्यांनी गद्दार लोकांना आणून बसवलंय. त्यामुळं घटनाबाह्य सरकारसुद्धा काहीही करत नाही, असंही चेन्नीथला म्हणाले. राज्यातील वाढती महागाई आणि बेरोजगारांची संख्या ही अत्यंत वाढल्यानं लोकांचा मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रोष आहे, ही जनता आता यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीला अधिक जागा : राज्यात महाविकास आघाडीला आता जास्तीत जास्त जागा मिळतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून आता ते काहीही वक्तव्य करु लागले आहेत. परंतु, जनता त्यांना भुलणार नाही असंही चेन्नीथला म्हणाले.