मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. खातेवाटपावर असलेल्या मतभेदामुळं हा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (11 डिसेंबर) दिल्लीला गेले आहेत. रात्री उशिरा फडणवीस यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
महायुतीत काही खात्यांवरुन मतभेद : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. महायुतीत काही खात्यांवरुन मतभेद असल्यामुळं महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे.
खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाची बैठक? : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. तर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतलीय. रात्री उशिरा फडणवीस यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीत असल्यामुळं खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. खातेवाटपाबाबत दिल्लीत बैठक झाली, तर त्या बैठकीला एकनाथ शिंदे येणार उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल नार्वेकरांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट :9 डिसेंबर रोजी भाजपा नेते राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार असून ते सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत. राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. त्यांनी सोशल मिडिया 'एक्स'वर पोस्ट करत नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत माहिती दिलीय. "आमची चर्चा महाराष्ट्राच्या प्रगतीशी आणि देशाच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर होती," असं राहुल नार्वेकर पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
हेही वाचा
- शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुक आमदारांची मंत्रिपदासाठी भाऊगर्दी; नेमका फॉर्म्युला काय?
- नितेश राणेंच्या बेताल वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? विरोधकांचा सवाल
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब, लोकसभेत विरोधक आक्रमक