नागपूर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. बहुमतात असलेल्या महायुतीकडून नाराज झालेल्या आमदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परभणीत झालेल्या हिंसाचारासह अनेक महत्त्वाचे मुद्दे आज चर्चेत येण्याची शक्यता आहे.
Live Updates
- वाल्मिक कराडचे फोन रेकॉर्ड सापडले तर सर्व स्पष्ट होईल. आमदाराला एक बॉडीगार्ड तर आरोपी असताना त्याला २ बॉडीगार्ड कसे, असा प्रश्न संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिकला अटक करा. नाहीतर बीडमध्ये मोठा मोर्चा काढला जाणार आहे, आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. परभणी, बीडच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला.
- काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी विधानसभेत परभणी आणि बीडमधील घटनेवरून स्थगन प्रस्ताव मांडला आहे. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला. पोलिसांनी चार तासानंतर कोम्बिंग ऑपरेशन केले. चर्चेला उशीर होईल, तेवढी राज्यात प्रतिक्रिया वाढत जाईल, अशी भूमिका मांडत पटोले यांनी चर्चा करण्याची मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी उद्या चर्चा करू, असे सांगितले. "सरकारलादेखील चर्चा करायची आहे. उद्या १०१ अन्वये प्रस्तावावर चर्चा केली जाईल," असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
- महायुती सरकारच्या काळात ३५ राजकीय हत्या झाल्या आहेत, असे आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " परभणी आणि बीडमधील अत्याचार झाला. ईव्हीएम मशिनमधून निवडून आलेल्या सरकारला जनतेच्या भावना कळत नाही".
- "भुजबळांचा राग ओढावू नये, म्हणून अजित पवार अधिवेशनाला आले नसावेत," असा टोला शिवसेनेचे (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी लगावला. ते विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलत होते.
- शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना खातेवाटपावरून कोणताही तिढा नसल्याचं सांगितलं. "खातेवाटपाबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे. महायुतीमध्ये सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे". लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार असल्याची त्यांनी माहितीही दिली आहे.