मुंबई : राजकारणात आल्यावर आमदार, खासदार होण्याचं ध्येय प्रत्येकाचं असतं. काही कार्यकर्त्यांना ही संधी मिळते, तर अनेकांना केवळ प्रतीक्षा करावी लागते. त्यातच, राजकीय नेत्यांच्या मुलाबाळांचाच विचार यासाठी प्राधान्यानं होत असल्यानं सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांवर मात्र, अनेकदा अन्याय होतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या विविध पक्षांच्या उमेदवार याद्यांवर नजर टाकली तरी यामध्ये घराणेशाहीचंच प्रतिबिंब पडल्याचं दिसून येतं.
एखाद्या कार्यकर्त्याला कठोर परिश्रम करुन, स्वत:ला सिध्द करुन उमेदवारीसाठी पात्र करावं लागतं. त्यामध्ये अनेकांची अनेक वर्षे वाया जातात. मात्र नेत्याच्या मुलाला, मुलीला, भावाला, बहिणीला, पत्नीला मात्र कोणतेही खास परिश्रम न करता ही संधी मिळते. त्यामुळं खऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, असं राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
भाजपाच्या यादीतील घराणेशाहीची उदाहरणं :भाजपानं त्यांच्या 99 उमेदवारांची यादी सर्वात प्रथम जाहीर केली. त्यामध्ये कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांना भोकरदनमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देण्यात आली. कल्याणमधून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी देण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर यांच्यावर पक्षानं पुन्हा विश्वास ठेवलाय. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आमदार मेघना बोर्डीकर यांना जिंतूरमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
शेवगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी आमदार मोनिका राजळे यांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या स्नुषा आमदार नमिता मुंदडा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचे पुत्र आमदार राहुल आहेर यांना पक्षानं पुन्हा संधी दिली. माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पनवेलमधून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दौंड मतदारसंघातून माजी आमदार सुभाष कुल यांचे पुत्र आमदार राहुल कुल यांना पुन्हा उमेदवारी मिळालीय. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आमदार सिध्दार्थ शिरोळे यांना शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.