नागपूर : राजकीय निर्णयाला योग्य ठरविण्यासाठी पक्षाविरोधात जाऊन केलेली बंडखोरी तर्कसंगत ठरवण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळे कारण पुढं करत आहेत. सध्या रामटेक मतदारसंघातही तेच बघायला मिळतंय. काँग्रेस बंडखोरांनी रामटेकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराच्या नाकी नऊ आणलेत. असं असताना बंडखोरी मागे खंबीरपणे उभे असलेल्या सुनील केदार यांनी ही बंडखोरी उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी असल्याचा दावा केला. ही बंडखोरी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आहे, असं सांगत मातोश्रीची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय. पण रामटेकमधील शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांना सुनील केदार यांचं हे म्हणणं मान्य नाही.
रामटेकमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार विजयी होणार? की काँग्रेसचा बंडखोर उमेदवार बाजी मारणार? की या दोघांच्या संघर्षात महायुती पुन्हा एकदा रामटेकमधून विजयी होणार का? हे येणाऱ्या 23 तारखेला स्पष्ट होईल. मात्र, या नव्या रामटेक पॅटर्नमुळं महाविकास आघाडीत खास करुन काँग्रेस आणि शिवसेनेत (उबाठा) मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे.
सुनील केदार, विशाल बरबटे, नाना पटोले यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) रामटेक पॅटर्न : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली पॅटर्न गाजला होता. पण विधानसभा निवडणुकीत रामटेक पॅटर्न गाजतोय. काँग्रेस आणि शिवसेनेत (उबाठा) रामटेक मतदार संघासाठी जोरदार रस्सीखेच झाली. हे प्रकरण रामटेकवरुन मुंबईपर्यंत, त्यानंतर मुंबईवरुन दिल्लीपर्यंत पोहोचलं. अखेरीस लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मतदार संघ काँग्रेससाठी सोडल्याच्या मोबदल्यात विधानसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघ हा शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला आला. विशाल बरबटे यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाली. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केल्यानंतर रामटेक पॅटर्न चर्चेत येऊ लागला.
आम्ही तर उद्धव ठाकरेंचा बदला घेतोय : आघाडीचा धर्म निभावण्याच्या नावाखाली काँग्रेसनं राजेंद्र मुळक यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र, काँग्रेस बंडखोर आणि पक्षातून निलंबित अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या प्रचार सभांमध्ये सुनील केदार आणि त्यांचे सहकारी पूर्ण शक्तीनं प्रचार करताना दिसून येत आहेत. तर राजेंद्र मुळक हेदेखील शेजारील मतदारसंघात काँग्रेसच्या मंचावर राजरोसपणे दिसून येतात. त्यामुळं रामटेकमध्ये काँग्रेसची नेमकी भूमिका काय? हे स्पष्ट होत नव्हतं. गुरुवारी (14 नोव्हेंबर) रामटेक मध्ये झालेल्या एका प्रचार सभेत सुनील केदार यांनी या संदर्भातील खुलासा केला. "उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी झाली. त्या गद्दारीमध्ये रामटेकमधील महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल अग्रभागी होते. आशिष जयस्वाल यांना पराभूत करून आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे", असं सुनील केदार म्हणाले.
बदला घेण्यासाठी आम्ही समर्थ :सुनील केदार जरी उद्धव ठाकरे यांच्या अपमानाचा मुद्दा समोर करून राजेंद्र मुळक यांची बंडखोरी तर्कसंगत ठरवण्याचा प्रयत्न करत असले तरी रामटेकमधील शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांना सुनील केदार यांचं हे स्पष्टीकरण मान्य नाही. तसंच उद्धव ठाकरे यांच्या उपमानाचा बदला आम्ही शिवसैनिक घेऊ, असं शिवसेना (उबाठा) उमेदवार विशाल बरबटे म्हणालेत. त्यासाठी बंडखोरीनंतर तुमच्या आणखी उपकाराची गरज नाही, असा टोलाही बरबटे यांनी लगावलाय.
आमच्यावर आणखी उपकार करू नका :पुढंते म्हणाले, "मी सुनील केदार यांना सांगू इच्छितो की उद्धव ठाकरेंचा बदला घेण्यासाठी आम्ही शिवसैनिक सक्षम आहोत. तुम्ही आघाडी धर्म पाळला तरी आमच्यासाठी खूप होईल. म्हणून आमच्यावर आणखी उपकार करू नका."
- मला माहिती नाही : काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व सध्यातरी रामटेक संदर्भात मौन बाळगून आहेत. रामटेक संदर्भात फारशी माहिती नाही, असंच उत्तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिलं.
हेही वाचा -
- रामटेकचा 'गड' कोण करणार सर? प्रभू राम कुणाला पावणार? जाणून घ्या राजकीय समीकरणे
- "माझ्यावर वार कराल तर फाशी द्या. असंच सोडलं तर...,"; कॉंग्रेस नेते सुनील केदारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा - SUNIL KEDAR reaction