महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मोदी सरकारची वाह वाह, 'मविआ'वर टीकास्त्र अन् पाच मिनिटांत... ; अमित शाह यांच्या सभेत नेमकं काय घडलं? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाह यांची चंद्रपुरात सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

Maharashtra Assembly Election 2024 Amit Shah criticized MVA during election campaign at Chandrapur
अमित शाह (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2024, 7:37 AM IST

चंद्रपूर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात चौफेर विकास होतोय. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला देखील काही कमी पडू दिलं नाही म्हणून त्यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकारची सत्ता येणं आवश्यक आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चालणारी महायुतीची सरकार हवी की, औरंगजेब फॅन क्लब असलेली महाविकास आघाडी सरकार हवी?", असा सवाल करत गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शाह चंद्रपुरात आले होते.

काय म्हणाले अमित शाह? :यावेळी बोलत असताना अमित शाह म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कायापालट केला. देशात आतंकवाद, नक्षलवाद संपवला. त्यांनी राम मंदिर उभारलं, कलम 370 हटवलं, ट्रिपल तलाकवर त्यांनी कायदा आणला, आता वक्फ बोर्डाच्या संदर्भात नरेंद्र मोदी हे कायदा आणणार आहेत", असं शाह यांनी सांगितलं. तसंच "अगोदर गडचिरोली जिल्हा नक्षलवादानं ग्रस्त होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी येथील नक्षलवाद संपुष्टात आणला. आता आम्ही झारखंड राज्य देखील नक्षलवादमुक्त करणार आहोत. 31 मार्च 2026 पर्यंत हे राज्य नक्षलवादमुक्त होणार," असा दावाही शाह यांनी केला.

अमित शाह चंद्रपूर सभा (ETV Bharat Reporter)

महाविकास आघाडीवर टीका : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधत शाह म्हणाले की, "आम्ही औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केलं. मात्र, यामुळं महाविकास आघाडीत पोटशूळ उठलाय. काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षानं आमच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध केलाय."

मोदींनी महाराष्ट्राला 50 लाख कोटी दिले : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कुठलीही कसर सोडली नाही. त्यांनी राज्याच्या विकासासाठी तब्बल 50 लाख 10 हजार कोटींचा निधी दिलाय. पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्प महाराष्ट्राला दिलेत. त्यामुळं आमच्या हातात सत्ता द्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो विकास खोळंबला होता, तो आम्ही भरून काढू", असंही शाह म्हणाले.

अवघ्या पाच मिनिटांत आटोपली सभा, भाजपा कार्यकर्ते हिरमुसले : अमित शाह यांची चंद्रपुरात 3.30 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी मोठ्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते जमलेले होते. मात्र, अमित शाह यांना चंद्रपुरात पोहोचायला उशीर झाला. त्यामुळं या लगबगीत अवघ्या पाच मिनिटांत शाह यांना सभा आटोपावी लागली. आपण फक्त चंद्रपूरची भेट घेण्यासाठी आलो आहोत, महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करत त्यांनी आपलं भाषण थांबवलं. मात्र, यामुळं अमित शाह यांचं भाषण ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट बघणारे भाजपा कार्यकर्ते हिरमुसले. शाह हे व्यासपीठावरुन उतरताच कार्यकर्ते देखील माघारी फिरले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, देवराव भोंगळे, करण देवतळे, कृष्णा सहारे उपस्थित होते. शाह यांनी जाताना या सर्वांच्या भाषणासाठी कार्यकर्त्यांना थांबण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, ते जाताच कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

हेही वाचा -

  1. "इंदिरा गांधी परत आल्या तरी....," कलम 370 वरुन अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
  2. "घड्याळ नको, कमळ आणा"; अमित शाहांचा चक्क राष्ट्रवादीविरोधात प्रचार, पाच मिनिटांत उरकलं भाषण
  3. उद्धव ठाकरे, तुम्ही कुठे बसलात याची आठवण करून देतो..अमित शाह यांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details