मुंबई Maha Vikas Aghadi Seat Sharing :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मुंबईत 36 पैकी 20 जागा शिवसेनेला :मुंबईत झालेल्या महाविकास आघाडी आजच्या बैठकीत मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 जागा शिवसेनेला द्याव्यात, अशी मागणी ठाकरे गटानं केल्याची माहिती आहे. तर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. वांद्रे पूर्व जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे. या जागेसाठी वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचा ठाकरे गटाचा विचार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) रवींद्र पवार यांना अणुशक्ती नगर या जागेवर उमेदवारी दिली जाईल, असं मानलं जात आहे. काँग्रेसनं चांदवलीच्या जागेची मागणी केली आहे. या जागेवर काँग्रेस नेते नसीम खान यांना उमेदवारी देणार आहे.