मुंबई Lok Sabha Speaker Election : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. नवीन सरकारचं पहिलं अधिवेशन 24 जूनपासून दिल्लीत सुरू होत आहे. त्यामुळं एनडीएतील कोणत्या घटक पक्षाच्या गळ्यात लोकसभा अध्यक्ष पदाची माळ पडेल याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. तर चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून लोकसभा अध्यक्ष पदाची मागणी करण्यात येत असल्याचं समोर येतंय. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. त्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत देखील चर्चा करू, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलंय (Source reporter)
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? :यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, "लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. जर भाजपाला लोकसभा अध्यक्षपद मिळालं तर ते चंद्राबाबू यांचा टीडीपी, नितीश कुमार यांचा जेडीयू त्याचबरोबर चिराग पासवान आणि जयंत चौधरी यांचा पक्ष फोडतील. भाजपाकडून होणाऱ्या फसवणुकीचा आम्हाला अनुभव आहे", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पुढं ते म्हणाले की, "टीडीपी ही लोकसभा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं ऐकण्यात आलंय. चंद्रबाबू नायडू यांचा उमेदवार लोकसभा अध्यक्षपदासाठी उभा राहिल्यावर त्याला आम्ही पाठिंबा देऊ. तसंच संपूर्ण इंडिया आघाडीचा पाठिंबा देण्यासंदर्भात इंडिया आघाडीत चर्चा करण्यात येईल." तसंच कायद्यानं उपाध्यक्ष पद विरोधकांनाच मिळालं पाहीजे, असंही त्यांनी म्हटलंय.
नरेंद्र मोदी थोड्या दिवसाचे पंतप्रधान : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली नाही. यासंदर्भात विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, "देशातली लोकशाही आणि संविधान वाचविण्याची भूमिका संघानं घ्यायला हवी. मागील दहा वर्षांमध्ये देशाचं जे काही नुकसान झालंय त्यामध्ये संघाचाही सहभाग होता. मोदी आणि शाह यांनी लोकशाही आणि देशातील जनतेचं मोठं नुकसान केलंय." पुढं ते म्हणाले की, "मोदी काही काळासाठीच पंतप्रधान आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदींची निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत नेता निवडण्यात आला. त्यामुळं नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचेच पाहुणे आहेत," असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला.
हेही वाचा -
- चंद्राबाबू नायडूंनी निवडणूक जिंकल्याशिवाय विधानसभेत पाऊल न ठेवण्याची घेतली होती शपथ! - Chandrababu Naidu
- आरएसएस सुनेत्रा पवारांना विरोध करणार का? मोहन भागवतांना संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut
- "मोदींना शपथ घेऊ द्या, त्यांच्यासाठी आम्ही मिठाई वाटू"-संजय राऊत - Sanjay Raut News