ठाणे Lok Sabha Elections :सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र्रातील शेकापचे दिवंगत जेष्ठ नेते गणपतराव देशमुखांचे शिष्य माढा लोकसभेच्या मैदानात तुतारीकडून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. इतके दिवस महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं खुद्द जानकर यांनीच सांगितल्यानंतर 24 मार्चला ते महायुतीकडून लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता माढा लोकसभा मतदार संघातून प्राध्यापक रघुनाथ पाटील यांचं नाव चर्चेला आलं आहे.
रघुनाथ पाटील यांच्या नावाची चर्चा : शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा धनगर समाजाला देण्याचे यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळं यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्रा. रघुनाथ पाटील यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. प्रा. रघुनाथ पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे शिष्य आणि शरद पवार यांचे खंदे आणि कट्टर कार्यकर्ते आहेत. पाटील यांनी धनगर समाजात गेली वीस वर्षे कुशल संघटक म्हणून काम केलंय. हलाख्याची परिस्थितीत प्रा. रघुनाथ पाटील यांचं शिक्षण झाल्यानं त्यांना तळागाळातील समाजाच्या परिस्थितीची जाणीव आहे.