मुंबई Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना सर्व राजकीय पक्षांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुतीच्या सरकारनं आपला नवा भिडू राज ठाकरे यांना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. तशा पद्धतीचा हिरवा कंदील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत बैठकांचं सत्र सुरू झालंय. आज (21 मार्च) मुंबईतील ताज लॅन्ड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी महायुतीत तीन जागांची मागणी केली आहे. दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी अशा तीन लोकसभा मतदारसंघावर राज ठाकरेंनी दावा केलाय. तसंच दक्षिण मुंबई या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, जर असं झालं तर या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पहायला मिळेल.
अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? : मागील दोन टर्म पासून दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा दबदबा आहे. तर महायुतीकडून या जागेवर मनसेचे बाळा नांदगावकर अथवा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळी इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असताना त्यांच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेनं उमेदवार दिला नव्हता. परंतु, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दक्षिण मुंबईत अमित ठाकरे यांचा थेट सामना उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ही लढत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशा पद्धतीचीच असणार असून यामध्ये महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षांचाही कस लागणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर शिवसेनेचाच अधिकार : याविषयी बोलताना उबाठा गटाचे प्रवक्ते वकील वैजनाथ वाघमारे म्हणाले की, दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर शिवसेनेचाच (ठाकरे गट) अधिकार असून ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना जिंकेल. एकनाथ शिंदेंनी जर ही जागा मनसेला दिली तर शिवसेनेच्या चिन्हावर त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. अशात जर राज ठाकरे यांनी या जागेवर त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उभं केलं तर कुठल्याही परिस्थितीत महायुती विशेष करून शिवसेना (शिंदे गट) अमित ठाकरे यांना विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार यामध्ये काहीही दुमत नाही.
दोन्ही बाजूंनी सारखेच आमदार : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये विधानसभेच्या 6 जागांचा समावेश आहे. यामध्ये वरळी, शिवडी, कुलाबा, मलबार हिल, भायखला, मुंबादेवी हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी वरळी येथे उबाठा गटाचे आदित्य ठाकरे, शिवडी येथे सुद्धा उबाठा गटाचे अजय चौधरी असे शिवसेना उबाठा गटाचे दोन आमदार या मतदारसंघात आहेत. काँग्रेसचे मुंबादेवीचे अमीन पटेल हे एकमेव आमदार या मतदारसंघात आहेत. तर मलबार हिल या मतदारसंघात भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोढा तर कुलाबा मतदारसंघात भाजपाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार असून भायखला या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आमदार आहेत. तसं पाहिलं तर उबाठा गटाचे 2 आणि काँग्रेसचा 1 असे महाविकास आघाडीचे 3 आमदार या मतदारसंघात असून भाजपाचे 2 आणि शिंदे गटाचा 1 असे महायुतीचे सुद्धा 3 आमदार या मतदारसंघात आहेत.
मतदारसंघावर पूर्वी भाजपा, नंतर काँग्रेस आणि आता शिवसेनेचं वर्चस्व : दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघावर यापूर्वी भाजपा त्यानंतर काँग्रेस आणि आता शिवसेनेचा दबदबा राहिलेला आहे. सोळाव्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) अरविंद सावंत हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांना 4 लाख 20 हजार 530 मतं मिळाली होती, आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ही 53.61 टक्के होती. तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 3 लाख 21 हजार 362 मतं मिळाली होती आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 40.97 टक्के इतकी होती. अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा 99 हजार 168 मतांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत अरविंद सावंत यांच्या विजयाचं अंतर जरी कमी झालं असलं तरी सुद्धा मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. लोकसभा 2014 मध्ये दक्षिण मुंबई मतदार संघामध्ये 64.71 टक्के मतदान झालं होतं तर 2019 च्या निवडणुकीमध्ये 79.75 टक्के मतदान या मतदार संघामध्ये झाले होते.
ठाकरे परिवारासाठी वर्चस्वाची लढाई : अमित ठाकरे हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून उभे राहिल्यास उद्धव ठाकरे यांची भूमिका काय राहील? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दक्षिण मुंबईची जागा उबाठा गटासाठी अतिशय महत्त्वाची असताना अमित ठाकरे यांच्या पाठीमागं असलेली महायुतीची शक्ती विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी हा सामना असला तरी सुद्धा थेट उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशा दोन बंधूंमधील हा सामना असणार आहे. मात्र, ठाकरे कुटुंबातून कुणाला पाठिंबा मिळेल हे पाहणं महत्वाचं असेल. अशाच पद्धतीची चढाओढ झारखंडमध्ये सुद्धा झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांच्या कुटुंबामध्ये बघायला मिळत आहे.
सोरेन कुटुंबातही वाद : झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांनी जेएमएम पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चामध्ये त्यांना सातत्यानं डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सीता सोरेन या झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर तीन वेळा आमदार झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या त्या वहिनी आहेत. पतीच्या निधनानंतर पक्ष त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पुरेसा पाठिंबा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा आणि सीता सोरेन यांचे सासरे शिबू सोरेन यांना पत्र लिहून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो प्रस्ताव मांडला गेला होता, त्याला सीता सोरेन यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर सोरेन कुटुंबामध्ये तेढ निर्माण झाले.
हेही वाचा -
- Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा
- BJP MNS Alliance : राज ठाकरे-अमित ठाकरे दिल्ली दरबारी; भाजपा-मनसेमध्ये बंद दाराआड घडतंय बरंच काही, दक्षिण मुंबईसाठी आग्रही?
- मनसेकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची चुरस, राज ठाकरे यांच्याकडे 'या' पाच जणांची नावे