महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

राज्यात भाजपाचे 23 उमेदवार घोषित; शिंदे गट-अजित पवार गट नाराज? घोडं आडलंय कुठं? - Lok Sabha elections - LOK SABHA ELECTIONS

Lok Sabha Elections : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना, जागावाटपाच्या तिढ्याबाबत मात्र अनेक राजकीय पक्षांमध्ये अजूनही बोंबाबोंब आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटपही अद्याप होत नसून, दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपाचीही बोंबाबोंब सुरू आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 6:47 PM IST

Updated : Mar 25, 2024, 6:55 PM IST

मुंबई Lok Sabha Elections : भाजपानं महाराष्ट्रातील आपली लोकसभा उमेदवारांची २० सदस्यांची पहिली यादी १३ मार्च रोजी घोषित केली. त्यानंतर ११ दिवसांनी रविवारी पुन्हा महाराष्ट्रातील ३ नाव घोषित केली. अशी एकंदरीत भाजपानं आतापर्यंत त्यांचे २३ उमेदवार घोषित केले असून, आता उर्वरित २५ उमेदवारांमध्ये भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट त्याचबरोबर मनसेला किती जागा द्यायच्या यावरून तिढा अद्याप कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय निवासस्थानी दिवस - रात्र बैठकांचे सत्र सुरू असून, यामध्ये तोडगा निघता निघत नाहीये.

भाजपाचे 23 उमेदवार जाहीर :आमचं जागावाटप महाविकास आघाडीपेक्षा लवकर झालंय. ८० टक्के महायुतीचं जागावाटप झालं असून २० टक्के जागावाटप लवकर होईल, असं खुद्द भाजपाचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. परंतु याला आता बऱ्याच दिवसांचा अवधी लोटला असून, उर्वरित जागावाटप अजूनही रखडलेलं आहे. याचं विशेष कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या काही विद्यमान खासदारांच्या जागी भाजपा आपल्या पक्षातील इच्छुकांना उमेदवारी देऊ पाहत आहे. या कारणाने शिंदे गटातील खासदार मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असून त्यांनी वेळोवेळी ही नाराजी एकनाथ शिंदे यांच्या समोर जाहीर केली आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचा सल्ला दिला असून विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांना जागा वाढवून दिल्या जातील असाही पवित्रा घेतला आहे.

शिंदे - फडणवीस यांची मध्यस्थी : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नाराज खासदारांची व कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. परंतु विद्यमान खासदार व कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांचंही ऐकायला तयार नसल्याने आता यामध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा काही ठिकाणी मध्यस्थी करत आहेत. परंतु त्यातही त्यांना यश येताना दिसत नाही.

शिंदे-पवार गटाला किती जागा? :विशेष म्हणजे महायुतीच्या उर्वरित २५ जागा घोषित व्हायच्या आहेत. या २५ जागांमध्ये भाजपासह एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट व मनसे यांनाही सामावून घ्यायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांची १८ जागांची मागणी पूर्ण होणे शक्य नाही. तर दुसरीकडे अजित पवार गटालाही कमीत कमी सहा ते सात जागा हव्या आहेत. ती मागणीसुद्धा पूर्ण होणार नाही असं बोललं जातंय. म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला किती जागा भाजपाकडून दिल्या जातात हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. असे असले तरी आमच्यात जागा वाटपाबाबत काही मतभेद नसून महाविकास आघाडीच्या अगोदर आमचं जागावाटप होईल. एक - दोन जागांबाबत चढाओढ सुरू आहे. परंतु त्यावरही लवकरच तोडगा काढला जाईल, असे भाजपा नेते, आमदार प्रसाद लाड म्हणाले.

शिंदे गटाचे या जागेवरून वाद : शिंदे गटाचे कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, यवतमाळ - वाशिमच्या खासदार भावना गवळी, त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे त्या जागेसाठी फार आग्रही आहेत. तसेच रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून उद्योग मंत्री उदय सामंत हे त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेली ठाणे लोकसभेची जागा भाजपाला हवी आहे. या सर्व जागांवर महायुतीमध्ये तेढ निर्माण झाला असून तो सुटता सुटत नाही. तर या जागेबाबत जर का दगाफटका झाल्यास अनेक उमेदवारांनी दुसरा पर्याय उपलब्ध असल्याचेही एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. त्या कारणाने आता एकनाथ शिंदे यांचीही डोकेदुखी वाढली आहे.

अजित पवार गटही नाराज? :अजित पवार गटाला रायगड, बारामती व शिरूर या जागा हव्या आहेत. पण त्याचसोबत धाराशिव, परभणी, सातारा आणि गडचिरोली- चिमूर या जागेसाठीसुद्धा अजित पवार गट आग्रही आहे. अशात भाजपाने गडचिरोली- चिमूर जागेवर अशोक नेते यांना उमेदवारी देऊन ती जागा आपल्या ताब्यात घेतली. याच कारणानं आता महायुतीतील अंतर्गत मतभेद वाढले असून, जागा वाटपाचा तिढा हा दिल्ली दरबारीच संपुष्टात येईल, अशी चिन्ह आहेत.

हेही वाचा -

  1. माझी उमेदवारी म्हणजे १० महिन्याच्या संघर्षाचा विजय; प्रतिक्रिया देताना प्रतिभा धानोरकर झाल्या भावूक - Pratibha Dhanorkar
  2. "हे असेच लोक आहेत, जिकडे"... महायुतीत जाणाऱ्या महादेव जानकरांना संजय राऊतांचा टोला - Sanjay Raut on BJP
  3. राजकीय नेत्यांची धुळवड! मुख्यमंत्री शिंदे नातवासोबत रंगले धुळवडीच्या रंगात, तर जितेंद्र आव्हाडांनी पारंपरिक पद्धतीनं केली होळी साजरी - Holi 2024
Last Updated : Mar 25, 2024, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details