चंद्रकांत पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका बारामती Lok Sabha Elections : भाजपाचे नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज (17 मार्च) बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला शरद पवारांना हरवायचंय. महाराष्ट्राचं नुकसान शरद पवारांनी केलंय', असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? :बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "देशात सरकार येणार म्हणून सर्वांना झुलवत ठेवायचं काम शरद पवारांनी केलंय. आता मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. तसंच शरद पवार यांचा पराभव करणं, आमचं एवढं एकच ध्येय आहे", असं ते म्हणाले. तर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्वाचं असेल.
राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात :पुढं ते म्हणाले की,"आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्यामुळं काही लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात, आणि आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो."
मावळमध्ये चिंतेचं कारण नाही : मावळच्या जागेसंदर्भात विचारण्यात आलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मावळची जागा कोणी लढवायची हे अद्याप ठरलेलं नाही. ती जागा शिवसेनेकडं गेली तरी बाळा भेगडे असो की अन्य आमचे पदाधिकारी असो, ते त्यांचं काम करतील. राजकारणात इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही. सध्या तेथे काही जण इच्छा व्यक्त करत असतील. पण ज्या दिवशी उमेदवार जाहीर होईल, त्यादिवशी भेगडे हे सुद्धा बारणे यांचा जयजयकार करतील", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- सुप्रिया सुळेंनी स्वत: जाहीर केली बारामतीतून उमेदवारी? 'त्या' व्हॉट्सअॅप स्टेटसची जोरदार चर्चा
- Supriya Sule Vs Sunetra Pawar: निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंची होणार का लढत? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांच मत
- पवारांचा बारामतीचा गड हलवण्याची भाजपची पुन्हा तयारी, केंद्रिय मंत्र्यांपासून बावनकुळेंचे आतापासूनच प्रयत्न सुरू