रत्नागिरी Vinayak Raut VS Narayan Rane : चिपळूणमध्ये आज (5 एप्रिल) इंडिया आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
काय म्हणाले विनायक राऊत :या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विनायक राऊत म्हणाले की, "आमच्यासमोर कोणीही येऊदेत, किमान अडीच लाखाच्या फरकानं त्याला आपटणार. तसंच महायुतीचा उमेदवार 12 तारखेपर्यंत ठरला तरी पुष्कळ आहे", असा टोला राऊत यांनी लगावला. किरण सामंत हे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरले असते, नारायण राणे हे माझ्यासाठी आव्हान नाही. राणे यांना तिसऱ्यांदा चितपट करण्याची संधी मला लाभणं हे माझं भाग्य आहे. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावं लागेल", असं भाकीतही यावेळी राऊत यांनी वर्तवलं.