मुंबई Shinde And Thackeray Group : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज (23 फेब्रुवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेत आपले अंतर्गत वाद बाजूला सारुन ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकत्र सहभागी झालेले पाहायला मिळाले.
ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकत्र : मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क स्मशानभूमीत राजकीय अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शिवसेना फुटीनंतर प्रथमच शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकत्र आल्याचं पहायला मिळालं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दोघांनी मनोहर जोशींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तर राज्यपाल रमेश बैस, शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या रश्मी ठाकरे यांनीही मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं.