कोल्हापूर Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेनं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी घोषित होऊन 24 तास उलटले नाही तोच कोल्हापुरात महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आलीय. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोरचं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी भाजपच्या कोणत्या कार्यकर्त्यांची कामं केली आहेत ते जाहीर सांगावं, कामाचं सोडा मंडलिक यांचे स्वीय सहाय्यक फोन उचलत नाहीत, नीट बोलत नाहीत अशी खदखद पहिल्याच बैठकीत व्यक्त केली, त्यामुळं महायुतीत सर्वकाही आलबेल नाही हे यातून स्पष्ट होतंय.
भाजपाच्या सदस्यांनी वाचला तक्रारींचा पाढा : कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे तुम्ही उमेदवार होता. तेव्हाही आम्ही पायाला पान बांधून तुमचा प्रचार केला. मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची कोणती कामं तुम्ही केली असा खडा सवाल जाधव यांनी विचारला. तसंच काम बाजूला ठेवा, तुम्हाला फोन केल्यानंतर तुमचे स्वीय सहाय्यक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत अशी जाहीर नाराजी जाधव यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजप नेते समजीतसिंह घाटगे, भारतीय जनता पक्षाचे तीन विभागांचे जिल्हाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या मनात मंडलिक यांच्याबाबत नाराजीचा सूर असल्याचं प्रतिबिंब या बैठकीत उमटलं तरीही आपल्या भाषणाचा शेवट करताना जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही भाजपाचे कार्यकर्ते अग्रभागी असतील, असा विश्वास व्यक्त केला, जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळं महायुतीत सर्वकाही आलबेल नाही हे यातून सिद्ध होतंय.