पाटणा Nitish Kumar Cabinet : बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालंय. 28 जानेवारीला नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय भाजपाकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच जेडीयूचे नेते विजय चौधरी, विजेंद्र यादव, श्रवण कुमार, अपक्ष आमदार सुमित सिंह, हम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन आणि भाजपाचे आमदार प्रेम कुमार या 6 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
सम्राट चौधरी :बिहारचे नवे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत, जे स्वत: एक मोठे नेते होते. सम्राट चौधरी 1999 मध्ये पहिल्यांदा राजदच्या कोट्यातून आमदार झाले. ते राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. नंतर ते जीतन राम मांझीसोबत गेले. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ते 2020 मध्ये एनडीए सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. सम्राट चौधरी यांना 27 मार्च 2023 रोजी बिहार भाजपाचं प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं.
विजय सिन्हा :बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे लखीसराय विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. ते लखीसराय येथून तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. ते 2020 मध्ये बिहार विधानसभेचे अध्यक्ष होते. उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी विजय सिन्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. आता ते बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
विजय चौधरी :सध्या उजियारपूर विधानसभेचे आमदार. महाआघाडी सरकारमध्ये ते आधी अर्थमंत्री आणि नंतर शिक्षणमंत्री झाले. रविवारी महाआघाडीचं सरकार कोसळल्यानंतर त्यांनी एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. विजय चौधरी हे जेडीयूचे मोठे नेते आहेत. नितीश कुमार यांच्या जवळचे असलेले विजय चौधरी 1982 मध्ये दलसिंहसराय विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर ते सरायरंजनचे आमदार झाले. ते बिहार जेडीयूचे अध्यक्षही राहिले आहेत.
विजेंद्र यादव : विजेंद्र यादव भोजपूर जिल्ह्यातील संदेश मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2000 मध्ये राष्ट्रीय जनता दलातून (RJD) आमदार म्हणून निवडून आले. परंतु नंतर ते जेडीयू मध्ये सामील झाले. रविवारी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली.