बीड : मस्साजोगचे संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील सरपंच होते. त्यांच्या हत्या प्रकरणी मलाही दु:ख आहे. मात्र, या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. त्यातूनच आपलं नाव पुढे केलं जात आहे. पण या प्रकरणाशी आपला काहीएक संबंध नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी आपण पहिल्या दिवसापासून करत आहोत, अशी भूमिका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली. सह्याद्री अतिथीगृहात त्यांची विभागाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते.
आरोपीला फाशी झाली पाहिजे : धनंजय मुंडे म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, या मताचा मी पहिल्या दिवसापासून आहे. संतोष देशमुख हे माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होते. यात जो कुणी गुन्हेगार आहे, मग तो कुणीही असो, कुणाच्याही जवळचा असो, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडू नका. तसंच राजकारणापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. यामागचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे. त्यामुळं यातील कुठल्याही आरोपीचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळं सरकार म्हणून या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीनं पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. - धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
घटनेचं राजकारण केलं जात आहे :पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जात आहे. मला मंत्री पद मिळू नये, पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी या घटनेचं दुर्दैवी राजकारण केलं गेलं. यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. त्यामुळं ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, अखेर घटनेतील सत्य आणि सूत्रधार समोर येईलच.
हेही वाचा -
- बीड जिल्ह्यात 1281 पिस्तूल परवानाधारक; विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांची संख्या किती?
- संतोष देशमुख हत्याप्रकरणात एन्काउंटर करून मिळवा 51 लाखांसह 5 एकर जमीन, शेतकऱ्यानं का दिली ऑफर?
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? सुरेश धस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर