मुंबई :बेळगाव आणि कर्नाटकमधील सीमा भागातील मराठी माणसावर कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा दडपशाही सुरु केली आहे. आज मराठा एकीकरण समितीचा मेळावा होऊ दिला नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, "जर देशातील कश्मीरसारखा प्रश्न सुटतोय तर सीमा प्रश्न सुटला पाहिजे किंवा सीमा प्रश्न का सुटणार नाही", असं चंदगड मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलं.
प्रश्न नक्की मार्गी लागेल : "सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक सरकार आली आणि गेली. परंतु हा प्रश्न काही सुटला नाही. पण आता हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती घेतली आहे. तिकडच्या सरकारशी बोलून यावर नक्कीच तोडगा निघेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हा प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका सकारात्मक आहे. तिकडच्या परिस्थितीची कल्पना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिली आहे. त्यामुळं हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल", असा विश्वास आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला.