मुंबई -कंगणानं शेतकरी आंदोलन सुरू असताना तेव्हाही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. आता एक वर्षानंतर शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यावरून कृषी, समाजिक आणि राजकीय क्षेत्रातून टीका होत आहे.
शेतकरी नेत्यांची उपरोधिक टीका (Source- ETV Bharat) केवळ अभिनेत्री असताना कंगणानं अनेकदा वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केली आहेत. पण, आता लोकप्रतिनिधी आणि संवैधानिक पदावर असणाऱ्या कंगणानं पूर्वीसारखी बेताल वक्तव्य करणं योग्य आहे का? असं सवाल राज्यातील शेतकरी नेत्यांनी उपस्थित केला. कंगणाच्या वक्तव्याचा शेतकरी नेत्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.
कंगणा राणौतनं काय वादग्रस्त विधान केलं? "दिल्लीमधील शेतकरी आंदोलन चीनने घडवून आणलं होतं. या आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचं षड्यंत्र होतं,"अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य कंगणा राणौत यांनी केलं आहे.
मोदी, भाजपा आणि संघाला मान्य आहे का? शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी म्हटलं, " शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिलांवर बलात्कार झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य कंगणानं केलं आहे. याच्यापेक्षा शेतकऱ्याचा अपमान काय असू शकतो? परंतु हे कंगणाचं बेताल वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसच्या लोकांना मान्य आहे का? हे मला माहित नाही." विजय जावंधिया यांनी कंगणावर खरपूस टीका करत टलं, " कंगणा यांना माझी एक विनंती आहे, त्यांना मोदींबद्दल एवढा पुळका आहे. तर त्याच मोदींच्या गुजरात राज्यात सलग 25 वर्षे भाजपाची सत्ता आहे. मग या गुजरात राज्यात हिंदू-आदिवासी शेतकऱ्यांची शेतमजुरी किती पटीनं वाढवली? याची जरा माहिती देण्यासाठी कंगणानं आमच्या गावात 'चाय पे चर्चा' यासाठी मी त्यांना माझ्या गावात आमंत्रित करतो. कारण, त्या आता संसद सदस्य आहेत. संसदच गरीब आणि शेतकरी हिताचे कायदे करू शकतात," अशी उपरोधिक टीका शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी कंगणा राणौतवर केली आहे.
पुरावे द्या, अन्यथा- महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, " जर याबाबत कंगणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि केंद्र सरकारकडं सादर करावेत. पण, जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर कंगणावरती गुन्हा दाखल करून तिच्यावर कारवाई करण्यात यावी." कंगणानं शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न केला आहे," असंही रघुनाथ पाटील यांनी म्हटलंय.
"अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली खासदार कंगणा राणौत ही पुन्हा एकदा आपल्या गटार गंगेतून बरळली आहे. तिने देशातील सर्व शेतकऱ्यांचा आणि आंदोलनाचा अपमान केला आहे. तिनं ताबडतोब माफी मागावी- माजी महिला आणि बालविकास मंत्री, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर
कंगणानं देशाची माफी मागावी-यशोमती ठाकूर कंगणाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, "शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी प्राणांतिक आंदोलन या ठिकाणी केले. अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या या बलिदानाची टिंगल टवाळी आणि थट्टा करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तसेच महिला शेतकऱ्यांवर बलात्काराच्या घटना घडल्याचं सांगून आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न राणौत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याबाबत गंभीर दखल घेत केंद्र सरकारनं चौकशी करावी," अशी मागणी आमदार ठाकूर यांनी यावेळी केली.
- वादग्रस्त वक्तव्य, वाद आणि कंगणा हे एक प्रकारचे समीकरण झालं आहे. कंगणा अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जून महिन्यात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चारच दिवसात कंगणा आणि सीआयएसएफ (CISF) महिला कर्मचारी कुलविंदर कौर यांच्यात सामान तपासणीवरून वाद झाला होता.
भाजपानं काय दिली प्रतिक्रिया?कंगणाच्या वक्तव्याच्या पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं भाजपानं म्हटलं आहे. तसेच तिच्या वक्तव्यावर असहमत असल्याचं म्हटलं आहे. भाजपानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं, "कंगणा राणौत यांना पक्षातील अंतर्गत धोरणावर बोलण्याची परवानगी नाही. तसेच त्यांना बोलण्यासाठी अधिकृत बोलण्याची परवानगी नाही. भविष्यात यापुढे असे वक्तव्य करू नये. भाजपाची सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास आणि सामाजिक समरसतेवर बांधिलकी आहे."
काय आहेत कंगणाचे आजवरचे वादग्रस्त विधाने?
- बर्बाद करेन- मणिकर्णिका चित्रपट प्रदर्शनापूर्वी करणी सेनेकडून कंगणाला धमकी देण्यात आली होती. "मी राजपूत आहे. मला त्रास देणं बंद केलं नाही, तर एकेकाला बर्बाद करेन..." असं कंगणानं प्रत्युत्तर दिलं होतं.
- शेतकऱ्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख-दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख कंगणानं दहशतवादी असा केला होता. 100 रुपयांसाठी शेतकरी आंदोलनाला बसलेत, असं कंगणा म्हणाली होती.
- कल तेरा घमंड टुटेगा- मविआ सरकार काळामध्ये "मुंबईत मला सुरक्षित वाटत नाही, मुंबई हा पाकिस्तानचा भाग आहे, असं कंगणाने म्हटलं होतं. यानंतर पालिकेनं कंगणाचे मुंबईमधील अनाधिकृत कार्यालय तोडले. त्यावेळी कंगणानं 'आज मेरा घर टुटा है... कल तेरा घमंड टुटेगा' असं उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं.
- भीक मागून स्वातंत्र्य मिळालं-"भारताला 1947 साली भीक मागून स्वातंत्र्य मिळालं होतं. खरं स्वातंत्र्य हे 2014 मध्ये मिळालं", असं वक्तव्य कंगणानं केल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता.
- गांधीजी चलाख नेते- "गांधीजी हे चालाख, सत्तेसाठी भुकेलेले नेते होते. एका तुम्हाला गालावर मारलं, तर दुसरा गाल पुढे करा... यामुळं केवळ स्वांतत्र्य नाही तर भीक मिळते", असं कंगणानं वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता.
ममता बॅनर्जींवर पोस्ट-"बंगालामध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी जिंकल्यानंतर बंगलामध्ये हजारो लोकांची हत्या झाली," अशी ममता बॅनर्जी यांच्यावर वादग्रस्त पोस्ट कंगणानं केली होती. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आझमी या पाकिस्तानात कार्यक्रमासाठी जाणार होत्या. या मुद्द्यावर कंगणानं गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझम यांच्यावर टीका केली होती. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगणाविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करून तिला न्यायालयात खेचलं आहे.
हेही वाचा-
- विनेश फोगटच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक विजयावर कंगना रणौतनं दिली वादग्रस्त प्रतिक्रिया - Paris Olympic 2024
- कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी'मधील 'सिंहासन खाली करो' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - emergency