मुंबई Jyoti Waghmare On Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) एक व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) नाशिक येथे पैश्यांच्या बॅग घेऊन गेल्याचा आरोप केलाय. "मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले... नुसता पै पाऊस... दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे". असं पोस्टमध्ये म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, राऊतांच्या या आरोपाला ज्योती वाघमारे यांनी प्रतिउत्तर दिलंय.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे : संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री हे जनतेचे नेते आहेत. ते 20-20 तास काम करतात. लोकांमध्ये मिसळतात, लोकांना भेटतात, लोकांची कामे करतात, म्हणून त्यांना दोन-दोन कपड्यांच्या बॅगा लागतात. पण तुमच्या नेत्यांसारखे ते घर कोंबडे नाहीत आणि त्या घर कोंबड्यांना बॅगा नाहीतर पैशांचे कंटेनर लागतात. हे राज ठाकरेंनी आधीच सांगितलंय. त्यामुळं चोराच्या मनात चांदणं. त्यामुळं दिसली बॅग की, त्याच्यात पैसेच असणार असं तुम्हाला वाटतंय, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलंय.