मुंबई -जसजसे मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तशी निवडणुकीतील प्रचाराची रंगत वाढत आहे. राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. काहीसा असाच प्रकार बुधवारी भल्या पहाटे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात पाहायला भेटला. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अनंत (बाळा) नर यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या समर्थकांकडून महिलांवर मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला.
शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, "जोगेश्वरी पूर्व येथील उबाठा पक्षाचे उमेदवार बाळा नर यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिलांवर हल्ला केला. त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कपडे फाडले. नखानं त्यांना मारण्यात आलं आहे. आमच्या महिला भगिनींची गाडीसुद्धा त्यांनी फोडली. घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक होते. हे सर्व काय आहे? ही कशा पद्धतीची गुंडागर्दी आहे? हे कशासाठी करत आहेत. कारण, हार होणार असल्याचं त्यांना माहित आहे. निवडणूक ते पूर्वीच हरले आहेत. त्यांना एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रमध्ये शांत पद्धतीनं निवडणुकीचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये बाधा निर्माण करायची आहे."
महिलांवर हात उचलले?-शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांमध्ये जबाब नोंदवायचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहितीसुद्धा शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. "उबाठा लोकांनी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व विचार सोडले आहेत. बाळासाहेब, आम्हा महिलांना रणरागिणी म्हणायचे. त्या महिलांवर हात उचलले आहेत. मी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना विचारू इच्छिते की, हे काय सुरू आहे. तुमचे लोकं हे काय करत आहेत? रात्री-अपरात्री तुमचे लोक भीतीचं वातावरण का निर्माण करू इच्छितात?" असा प्रश्नही शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप-शिवेसेनेनं (उद्धव ठाकरे) जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात आचारसंहिता भंग होत असल्याचा आरोप केला. शिवसेनेनं (उबाठा) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, "आचारसंहिता भंग होत असताना आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या गुंडांनी जोगेश्वरी पूर्व येथील मातोश्री क्लबवर दगडफेक केली. अशा घटनाबाह्य आणि लाजिरवाण्या कृतीवर कठोर कारवाई करावी ही विनंती."