छत्रपती संभाजीनगर Imtiyaz Jaleel : नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू असल्याचा हल्लाबोल एमआयएम प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय, राणे यांचा मुलगा एका समाजाबद्दल वादग्रस्त बोलत असताना सरकार काहीच करत नाही. त्यामुळं कायद्यात राहुन मुंबईला येऊन संविधानाची प्रत देणार आहोत. कोणत्या एका पक्षाचा नाही तर समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत जाब विचारणार आहोत. तर धारावीमध्ये घडलेला प्रकार म्हणजे आगामी निवडणुकीसाठी वातावरण तापवण्याचा प्रकार असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.
23 सप्टेंबरला मुंबईला जाणार :भाजपा नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी देखील समाजाबद्दल चुकीचं विधान केलं होतं. यांच्याविरोधात आम्ही 23 सप्टेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, आम्ही कुठल्या पक्षाकडून नाही तर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूना जी लोक बोलली त्यांच्याविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी मुंबईला जाणार आहोत. संभाजीनगर पोलिसांनी आम्हाला नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही शहरात काहीच करणार नाही, आम्ही मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून संविधान भेट देणार आहोत. आम्ही मुंबईकडं मोठ्या संख्येने निघणार असून कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात नसेल असं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.