पुणेHarshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षात संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच इंदापूरमध्ये भाजपाच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळं सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय. ही बाब गंभीर असून यात तत्काळ लक्ष द्यावं अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांना केलीय.
तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी : भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीनं कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आहे. असं असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी जाहीर मेळावे आणि सभामधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळं मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.