नागपूर : नागपुरात शेखु आणि हिरणवार टोळीतील युद्ध हे पुन्हा भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याला कारण म्हणजे बुधवारी जिल्ह्यातील खापरखेडा भागातील बाबूळखेडा शिवारातमध्ये शेखु टोळीच्या गुंडांनी हिरणवार टोळीचा पाठलाग करत अंदाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये पवन हिरणवार (Pawan Hiranwar) तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. आद्याप या प्रकरणी चार आरोपींना अटक झाली असून या घटनेचा सूत्रधार शेखु हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी व्यक्त केली आहे.
पूर्व वैमनस्यातून हत्या : या गोळीबारात पवन हिरणवारचा मृत्यू झाला आहे, तो देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भावाच्या हत्येचा घेतला बदला : दोन वर्षांपूर्वी शेखु टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या शेखुच्या भावाची हत्या झाली होती. ती हत्या पवन हिरणवारच्या भावानं केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी शेखु आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून पवन हिरणवार आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. या घटनेत पवनचा भाऊ हा जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये सिद्धार्थ उर्फ गणेश दिनेश कोवे, प्रथम उर्फ बाबू शाक्य, अभिराज कैलास कानोजिया, ललित उर्फ अवि भुसारी यांचा समावेश असून मुख्य सूत्रधार शेखु हा फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत असल्याचं रमेश धुमाळ यांनी सांगितलं.
सिने स्टाईल केला गोळीबार : पवन धीरज हिरणवार दोन मित्रांसोबत कारने जात असताना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाबुळखेडा शिवारात तीन दुचाकीने आलेल्या पाच आरोपींनी पाठलाग करण्यास सुरूवात केला. त्यावेळी पवन हिरणवार वेगाने कार पळवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी कारवर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये एक गोळी पवन हिरणवारला लागली. त्यामुळं पवन हिरणवारचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत.
गोळीबारानंतर आरोपी फरार : गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करणारे लोक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर खापरखेडा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व आरोपी हे फरार झाले होते. मात्र, त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी दिली.
हेही वाचा -