सातारा :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता अखेरचा टप्पा सुरू झाल्यामुळं स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका सुरू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांच्या विमानांची तसंच बॅगांची कराड विमानतळावर कसून तपासणी करण्यात आली.
अंबाबाईच्या दर्शनाने प्रचाराची सुरुवात : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारासाठी शनिवारी (९ नोव्हेंबर) पहिल्यांदा कोल्हापुरात आले. महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर बुधवारी (१३ नोव्हेंबर) ते कराडमध्ये दाखल झाले. कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या डॉक्टरांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं.
कराड विमानतळावर डॉ. प्रमोद सावंतांच्या साहित्याची तपासणी (ETV Bharat Reporter)
मोकळ्या विमानांची देखील तपासणी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोल्हापूरहून कारने कराडला आले. मात्र, त्यांच्या पुढील दौऱ्यावर जाण्यासाठी दोन विमाने अगोदरच कराड विमानळावर आली होती. त्या मोकळ्या विमानांची देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. तपासणीचं व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आलं.
कराडातून रवाना होताना बॅगा आणि साहित्य तपासलं :डॉ. प्रमोद सावंत हे पुढील नियोजित दौऱ्यावर जाण्यासाठी गुरूवारी सकाळी कराड विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्याकडं दोन बॅगा होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा आणि साहित्याची तपासणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढील दौऱ्यासाठी विमानाने रवाना झाले. डॉ. सावंत यांना भाजपाने खास करून कोकणातील प्रचारात उतरवलं आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. डॉ. सावंत यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचाही समावेश आहे.
हेही वाचा -
- 'ऑपरेशन लोट्स'; भाजपानं प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिली; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप
- विधानसभा निवडणूक 2024: महाविकास आघाडीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, काँग्रेस अंतर्गत सर्वेक्षणातील निष्कर्ष
- बटेंगे तो कटेंगे नही, पढोगे तो बढोगे; सचिन पायलट यांचा नवा नारा