छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad Passed Away) यांचं शुक्रवारी निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी (6 डिसेंबर) वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येतोय.
देवेंद्र फडणवीसांनी दिला आठवणींना उजाळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रासाठी ही अत्यंत मोठी हानी आहे. पिचड यांनी तळागाळातून काम सुरू केलं. अगदी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेपासून विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी कामं केलंय. विशेषत: त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील. आदिवासी समाजाच्या आश्रम शाळा, शिक्षणाची व्यवस्था असेल, समाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था असतील किंवा नगर जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणाच्या सोयी असतील, सातत्यानं वंचितांकरता लढणारा हा नेता होता."
देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) तसंच निळवंडे धरणाच्या वेळी ते विरोधी पक्षात होते आणि मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मी त्यांना विनंती केली तसंच त्यांच्यासोबत बैठक घेत म्हटलं होतं की, "हे धरण पूर्ण केलं आणि कालवा झाला तर आपल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष मदत मिळेल. यानंतर तत्काळ त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. जे या धरणाच्या विरोधात होते, त्यांच्याशी त्यांनी स्वत: चर्चा केली आणि निळवंडे धरणाचं काम पूर्ण करण्यासाठी मोठी मदत केली," अशी आठवणही फडणवीसांनी सांगितली.
सर्व क्षेत्रात काम करणारा नेता गेला :पुढं ते म्हणाले, "एक युग गाजवलेले अशाप्रकारचे आदिवासी समाजातील ते नेते होते. त्यांच्याकडं एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जायचं. त्यांचं वक्तृत्व अतिशय उत्कृष्ट असं होते. त्यामुळं असा एक नेता आपल्यातून निघून जाणं ही अतिशय दुःखद अशी बाब आहे." तर पिचड यांच्यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यविधी होतील, असे आदेश दिलेले आहेत. त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली :"ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळं आदिवासी कल्याणाचं एक प्रदीर्घ पर्व जणू संपलं. आदिवासी कुटुंबातच जन्म घेतलेल्या मधुकररावांनी साठीच्या दशकाच्या प्रारंभाला दूध संघाची निर्मिती करुन समाजकारणाचा वसा घेतला. त्यांचे सारे राजकारण आदिवासी बांधवांच्या कल्याणाभोवतीच राहिले. काही काळ ते ठाण्याचे पालकमंत्रीही होते. त्यांच्यातला आदिवासींचा सजग कैवारी मला जवळून पाहायला मिळाला. मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच, पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
चांगल्या सहकाऱ्याला मुकलो : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "मधुकर पिचड यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी पूर्ण आयुष्य दिलं. पिचड हे आजारावरती मात करतील, असा आम्हाला विश्वास होता. मात्र, तसं झालं नाही. राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आणि त्यांचं काम अतिशय उत्तम होतं. त्यांनी अनेक खाती सांभाळली होती. तसंच आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याचं आम्हाला दुःख आहे."
हेही वाचा -
- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन; शनिवारी होणार अंत्यसंस्कार